केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारविरोधात विरोधी पक्ष एकवटले आहेत. या विरोधी पक्षांनी भाजपाला पराभूत करण्यासाठी एकत्र येत इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. देशातले तब्बल २८ विरोधी पक्ष पुढच्या वर्षी होणारी लोकसभा निवडणूक आणि देशातील इतर अनेक विधानसभा निवडणुका इंडिया आघाडी म्हणून लढवणार असल्याचं विरोधकांनी स्पष्ट केलं आहे. दुसऱ्या बाजूला सत्ताधाऱ्यांकडून इंडिया या नावाला विरोध होत आहे. दरम्यान, केंद्र सरकारने संसदेचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे. या अधिवेशनात देशाचं इंडिया हे नाव हटवण्याचा प्रस्ताव मांडण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. यावरून आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. माजी भारतीय क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग याने यावर दोन सूचक ट्वीट केले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विरूने म्हटलं आहे की मला नेहमीच असं वाटत आलं आहे की, नाव असं असलं पाहिजे, जे आपल्या मनात अभिमान निर्माण करेल. आपण सगळे भारतीय आहोत आणि इंडिया हे नाव इंग्रजांनी आपल्या देशाला दिलेलं आहे. त्यामुळेच टीम इंडियाचं नावही बदलायला हवं. सेहवागने ट्विटरवरून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि बीसीसीआयचे सचिव जय शाह यांच्याकडे मागणी केली आहे की आगामी विश्वचषक स्पर्धेत आपल्या खेळाडूंच्या छातीवर ‘भारत’ लिहिलेलं असलं पाहिजे.

एकीकडे देशाचं नाव बदलण्याच्या चर्चा सुरू असतानाच आता सेहवागच्या या ट्वीटनंतर भारतीय क्रिकेट संघाचं नावही बदललं जाईल, असं बोललं जात आहे. तसेच भारतीय खेळाडूंच्या जर्सीवर इंडिया ऐवजी भारत असं लिहिलेलं पाहायला मिळू शकतं. सेहवागने इंडिया विरुद्ध नेपाळ या सामन्याआधी ट्वीटरवर भारत विरुद्ध नेपाळ असा हॅशटॅग वापरला होता.

दरम्यान, वीरेंद्र सेहवागने आणखी एक ट्वीट केलं आहे. बीसीसीआयने आगामी विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड केली असून १५ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. याची माहिती बीसीसीआयने ट्विटरवरून दिली आहे. बीसीसीआयचं हे ट्वीट रीट्वीट करत सेहवागने म्हटलं आहे की टीम इंडिया नाही, टीम भारत. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत आपण विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, रवींद्र जाडेजा यांचा जयजयकार करणार आहोतच. ते करत असताना आपल्या हृदयात भारत असायला हवा. आपले खेळाडू भारत असं लिहिलेली जर्सी घालून मैदानात उतरतील. या ट्वीटमध्येही विरूने जय शाह यांचं नाव नमूद केलं आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virender sehwag wants bharat on indian cricketers jersey in world cup 2023 urge bcci rename team india asc