Virender Sehwag’s name is being discussed for the post of Chief Selector: भारतीय संघाला यावर्षी दोन मोठ्या स्पर्धांमध्ये सहभागी व्हायचे आहे. एक आशिया कप आणि दुसरा आयसीसी एकदिवसीय विश्वचषक. या दोन्ही स्पर्धांमध्ये सर्वांच्या नजरा संघ निवडीवर असणार आहे. चेतन शर्मा यांनी मुख्य निवडकर्ता पदाचा अचानक राजीनामा दिल्यानंतर निवड समितीमध्ये रिक्त पद आहे.
सध्या भारतीय संघाच्या मुख्य निवडकर्त्याची जबाबदारी शिव सुंदर दास सांभाळत आहेत. दरम्यान, रिक्त असलेल्या एका पदाबाबत माजी भारतीय खेळाडू वीरेंद्र सेहवागचे नाव वारंवार समोर येत आहे. मात्र, निवडकर्त्यांना दिले जाणारे वेतन ही मोठी अडचण असल्याचे बोलले जात आहे.
एकेकाळी भारतीय संघाच्या मुख्य निवडकर्त्याची जबाबदारी दिलीप वेंगसरकर आणि के.के. श्रीकांतसारखे दिग्गज खेळाडू सांभाळताना दिसले. पण आता दिग्गज खेळाडू ही जबाबदारी पार पाडण्यापासून स्पष्टपणे टाळाटाळ करत आहेत. निवडकर्ता म्हणून मिळणारा पगार खूपच कमी आहे, असा यामागे सर्वांचा विश्वास आहे. यावेळी उत्तर विभागातील एका नावाचा निवड समितीमध्ये समावेश करण्यात येणार आहे. याबाबत वीरेंद्र सेहवागचे नाव पुढे येत आहे.
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयला आपल्या निवेदनात सांगितले की, प्रशासकांच्या समितीच्या कार्यकाळातच सेहवागला मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज करण्यास सांगितले होते, परंतु नंतर अनिल कुंबळे प्रशिक्षक बनला. त्यामुळे आता तो स्वतःहून अर्ज करेल असे वाटत नाही. याशिवाय त्याच्यासारख्या मोठ्या खेळाडूलाही त्याच्या उंचीनुसार मोबदला द्यावा लागेल.
युवराज, गंभीर आणि हरभजन या कारणामुळे अर्ज करू शकत नाहीत –
उत्तर विभागातील कोणतेही एक नाव निवड समितीमध्ये समाविष्ट करायचे आहे. यासाठी वीरेंद्र सेहवाग व्यतिरिक्त मोठी नावे पाहायला मिळतात, त्यात गौतम गंभीर, युवराज सिंग आणि हरभजन सिंग यांचाही समावेश आहे. मात्र हे तिन्ही खेळाडू अद्याप या पदासाठी पात्र नाहीत. वास्तविक, खेळाडू निवृत्तीच्या ५ वर्षानंतरच या पदासाठी अर्ज करू शकतात.
हेही वाचा – TNPL 2023: सी सरथ कुमारच्या शॉटने चाहत्यांना झाली सूर्यकुमार यादवची आठवण, पाहा VIDEO
निवड समितीच्या सदस्यांना मिळणारे वेतन –
सध्या भारतीय संघाच्या निवड समितीच्या सदस्यांना मिळणाऱ्या पगारावर नजर टाकली, तर मुख्य निवडकर्त्याला वर्षाला एक कोटी रुपये मिळतात. त्याच वेळी, निवड समितीच्या इतर सर्व सदस्यांना बीसीसीआयकडून वार्षिक पगार म्हणून ९० लाख रुपये दिले जातात.