India vs Pakistan World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक २०२३ मधील १२वा सामना भारत आणि पाकिस्तान संघात खेळला गेला. दोन्ही संघ अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आमनेसामने आले होते. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ७ विकेट्सने पराभव केला. त्याचबरोबर विश्वचषकातील आपली विजयी घोडदौड कायम ठेवली. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पाकिस्तानचा संघ ४२.५ षटकांत १९१ धावांवर गारद झाला. प्रत्युत्तरात भारताने ३०.३ षटकांत ३ गडी गमावत १९२ धावा करून सामना जिंकला. टीम इंडियाच्या विजयानंतर माजी खेळाडू वीरेंद्र सेहवागची एक्सवरील पोस्ट (ट्विटर) व्हायरल होत आहे.
भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने पाकिस्तानच्या फ्लॉप फलंदाजीचा समाचार घेतला. त्याने शोएब अख्तरच्या सोशल मीडियाला पोस्टला चोख प्रत्युत्तर दिले. यानंतर सेहवागच्या सोशल मीडिया पोस्टवर चाहत्यांनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.वास्तविक शोएब अख्तरने एक्सवर पोस्ट करताना लिहले होते की, “वाह रे हे खामोशी के चौके!!” शोएब अख्तरला प्रत्युत्तर देताना सेहवागने लिहिले की, “हेच चौकार पाहून कदाचित पाकिस्तानी फलंदाजांनी लवकरात लवकर पॅव्हेलियनमध्ये परतण्याचा निर्णय घेतला. मित्रा, दबाव हाताळू शकले नाहीत. पण शोएब भाई काही हरकत नाही. जी मजा ८-० च्या पराभवात आहे, ती मजा ना प्रेमात आहे ना इतर कोणत्या गोष्टीत.”
एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा सात वेळा पराभव केला आहे. हा सामना जिंकून भारत ही स्थिती ८-० ने अशी केली. सेहवागने आणखी एक पोस्ट केली आणि लिहिले, “आमचा पाहुणचार वेगळा आहे. पाकिस्तानच्या सर्व खेळाडूंना फलंदाजी मिळाली. येथे प्रत्येकाची काळजी घेतली जाते.”
टीम इंडियाने १९९२ च्या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचा ४३ धावांनी पराभव केला होता. हा सामना सिडनी येथे खेळला गेला. यानंतर १९९६ मध्ये बंगळुरूमध्ये ३९ धावांनी पराभव केला. १९९९ मध्ये मँचेस्टरमध्ये ४७ धावांनी पराभव केला. टीम इंडियाने २००३ मध्ये सेंच्युरियनमध्ये पाकिस्तानचा ६ गडी राखून पराभव केला होता. यानंतर २०११ मध्ये मोहालीत २९ धावांनी पराभव केला. त्याचबरोबर २०१५ मध्ये ७६ धावांनी आणि २०१९ मध्ये ८९ धावांनी पराभूत केला होता. त्यानंतर आज ७ विकेट्सने मात करत आठव्यादा विजय नोंदवला.