विश्वचषक २०२३ च्या अंतिम सामन्यातून भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताला केवळ २४० धावाच करता आल्या. परिणामी २४१ धावांचं लक्ष्य ऑस्ट्रेलियाने सहज पार केलं आहे. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताला हरवत ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा विश्वचषकावर नाव कोरलं आहे.
दरम्यान, भारताचा माजी विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागने भारतीय फलंदाज विराट कोहली आणि केएल राहुलच्या फलंदाजीवर नाराजी व्यक्त केली आहे. विराट आणि राहुलने अत्यंत संथपणे फलंदाजी केली. त्यांनी धावा करण्यासाठी एकदाही धोका पत्करला नाही. त्यामुळे भारताला २४०च धावा करता आल्या. विराट आणि राहुलने थोडी आक्रमक खेळी केली असती तर भारत सुस्थितीत असता, अशी प्रतिक्रिया सेहवागने दिली.
‘क्रिकबझ’शी संवाद साधताना सेहवाग म्हणाला की, कोहली आणि राहुलने आपल्या मनात २५० धावांचं लक्ष्य ठेवून खेळत होते. पण त्यांच्या भागीदारीदरम्यान एकेरीसह आणखी काही धावा आल्या असत्या तर सन्मानजनक धावसंख्या उभारता आली असती.
हेही वाचा- IND vs AUS Final: अंतिम सामन्यात विराट आणि लाबुशेनमध्ये तणाव; एकमेकांना खुन्नस देतानाचा VIDEO
“भारताच्या दोन विकेट पडल्यानंतर, कोहली आणि राहुलला वाटले की, खेळपट्टी संथ आहे. त्यामुळे २५० धावांचं लक्ष्य मनात ठरवून ते संथ खेळू लागले. त्यांनी एकही धोका पत्करला नाही. जेव्हा दुसरा पॉवरप्ले चालू होता ज्यामध्ये पाच खेळाडू वर्तुळात होते. तेव्हा भारताला प्रत्येक षटकांत कोणताही चौकार किंवा षटकार न मारता किमान ४-५ धावा करता आल्या असत्या. दोघांपैकी एकाने आक्रमक खेळी करायला हवी होती. राहुलने १०७ चेंडू खेळून केवळ ६६ धावा केल्या. तो शेवटपर्यंत टिकून खेळला असता तर कदाचित त्याने धावा आणि चेंडूंमधलं अंतर कमी केलं असतं. पण स्टार्कने एवढा अप्रतिम चेंडू टाकला की तो (राहुल) काहीही करू शकला नाही,” असं सेहवाग म्हणाला.