भारताचा माजी विश्वविजेता खेळाडू विश्वनाथन आनंद याला नॉर्वे चषक बुद्धिबळ स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. त्याच्याविरुद्धचा डाव बरोबरीत सोडवित बल्गेरियाच्या व्हॅसेलीन तोपालोव्ह याने अजिंक्यपदावर मोहोर नोंदविली.
शेवटच्या फेरीत तोपालोव्ह व आनंद यांच्यातील लढतीविषयी कमालीची उत्कंठा निर्माण झाली होती. ही लढत अतिशय रंगतदार होईल अशी अपेक्षा होती, मात्र तोपालोव्ह याने यापूर्वी विश्वविजेतेपदाच्या लढतीत आनंदकडून पराभव स्वीकारला आहे. त्यामुळेच तोपालोव्ह याने फारसा धोका न पत्करता सावध खेळ करण्याचा निर्णय घेतला. तोपालोव्ह हा सध्या चांगल्या दर्जाचा खेळ करीत आहे, साहजिकच त्याच्याविरुद्ध जोखीम न पत्करता बरोबरी स्वीकारत उपविजेतेपदावर समाधान मानावे हाच दृष्टिकोन आनंदने ठेवला.
डावानंतर आनंद म्हणाला,की काही धाडसी चाली करण्याची माझी तयारी होती, मात्र तोपालोव्ह हा केव्हांही डावास कलाटणी देऊ शकतो हे ओळखूनच मी त्या फंदात पडलो नाही. स्पर्धेतील कामगिरीबाबत मी खूप समाधानी आहे. कार्लसन याच्यावर मी मात करू शकलो ही माझ्यासाठी मनोधैर्य उंचावणारी गोष्ट आहे. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी मी काहीसा निराश होतो कारण माझ्या खेळातील लय हरवली आहे असेच मला वाटत होते. पहिल्या तीन डावातील बरोबरीनंतरही मी फारसा समाधानी नव्हतो. तथापि शेवटच्या पाच डावांमध्ये मी चांगल्या दर्जाचा खेळ करू शकलो याचेच मला समाधान वाटत आहे. काही वेळा नियोजनबद्ध खेळाऐवजी प्रत्यक्ष लढतीचे वेळी झटपट निर्णय घेणे सोईचे असते, असे माझे मत झाले आहे.
तोपालोव्ह म्हणाला,की आनंदविरुद्ध धोका पत्करणे म्हणजे पराभव ओढवून घेण्यासारखेच आहे. त्यामुळेच मी या डावात बचावात्मक खेळावर भर दिला. आनंदनेही खूप धाडसी चाली केल्या नाहीत. त्यानेही डाव बरोबरीत ठेवण्याच्या दृष्टीनेच खेळ केला हे माझ्या पथ्यावरच पडले.

Story img Loader