विश्वविजेत्या विश्वनाथन आनंदने महत्त्वाच्या क्षणी कामगिरी उंचावत फ्रान्सच्या लॉरेन्ट फ्रेसनेट याच्यावर विजय मिळवत अल्खाईन स्मृती बुद्धिबळ स्पर्धेत सातव्या फेरीअखेर संयुक्तपणे तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. या विजयामुळे आनंदचे चार गुण झाले आहेत. आनंदसाठी हा विजय दिलासा देणारा ठरला आहे. १० बुद्धिबळपटूंच्या या स्पर्धेत दोन फेऱ्या शिल्लक असून आनंदला रशियाच्या पीटर स्विडलरविरुद्धच्या लढतीत पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळण्याचा फायदा मिळणार आहे. या सामन्यात आनंदने विजय मिळवल्यास आनंदला अग्रस्थानी मजल मारण्याची संधी मिळणार आहे. गेल्या विश्वविजेतेपदाच्या लढतीत आनंदचा प्रतिस्पर्धी असलेल्या इस्रायलच्या बोरिस गेलफंड याने सुरेख कामगिरीचे प्रदर्शन करत चीनच्या डिंग लिरेन याचा पराभव केला. गेलफंडने ४.५ गुणांसह मॅक्सिम व्हॅचियर-लॅग्रेव्ह याच्यासह संयुक्तपणे अग्रस्थान पटकावले आहे. त्यानंतर आनंद, इंग्लंडचा मायकेल अॅडम्स आणि अर्मेनियाचा लेव्हॉन अरोनियन यांनी स्थान प्राप्त केले आहे. फ्रेसनेट ३.५ गुणांसह सहाव्या स्थानी घसरला आहे. रशियाचा व्लादिमिर क्रॅमनिक आणि निकिता विटुइगोव्ह यांनी तीन गुणांसह संयुक्तपणे सातवे स्थान मिळवले आहे. डिंग लिरेन नवव्या तर स्विडलर दहाव्या स्थानी आहे.
आनंदने स्कॉच पद्धतीने डावाची सुरुवात करत फ्रेसनेटला आश्चर्याचा धक्का दिला. फ्रेसनेटची सामन्यावरील पकड सुटत चालल्याचे आनंदच्या लक्षात आले. सामन्याच्या मधल्या भागात आनंदने सुरेख चाली रचल्या. या चालींना प्रत्युत्तर देणे फ्रेसनेटला जमले नाही. अखेर आनंदने ४९ चालींनंतर विजय मिळवला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा