जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या मॅग्नस कार्लसन याने अतिशय गांभीर्याने गृहपाठ केला आहे. त्यामुळेच त्याच्याविरुद्ध सुरू असलेल्या विश्व अजिंक्यपद बुद्धिबळ लढतीत गतविजेत्या विश्वनाथन आनंद याला दुसऱ्या डावात पांढऱ्या मोहऱ्यांचा फायदा घेता आला नाही. पहिल्या डावाप्रमाणेच दुसरा डावही बरोबरीत सुटला आहे.
शनिवारी पहिला डाव १६चालींमध्ये बरोबरीत सुटला होता. त्यानंतर दुसऱ्या डावातही दोन्ही खेळाडूंनी २५व्या चालीस बरोबरी मान्य केली. १२ डावांच्या या लढतीमध्ये दोन्ही खेळाडूंचा प्रत्येकी एक गुण झाला आहे. सोमवारी विश्रांतीचा दिवस आहे. तिसरा डाव मंगळवारी दुपारी ३ वाजता होणार आहे.
आनंदने कारोकान बचाव तंत्राचा उपयोग करीत डावाची सुरुवात केली. अनपेक्षित चाली खेळण्याबाबत ख्यातनाम असलेल्या कार्लसन याने बचावात्मक चालींवर भर दिला. १७व्या चालीपर्यंत दोन्ही खेळाडूंनी आक्रमक चालींवर जास्त भर न देता नियमित डावपेचांवर लक्ष केंद्रित केले होते. एकमेकांच्या विरुद्ध बाजूला त्यांनी कॅसलिंग केले. आक्रमणासाठी चांगली व्यूहरचना मिळविण्याच्या हेतूने १८व्या चालीला आनंदने वजिरा-वजिरी केली. मात्र त्याला अपेक्षित अशी व्यूहरचना साध्य झाली नाही. त्यामुळे २१व्या चालीपासून आनंदने बरोबरीसाठीच प्रयत्न सुरू केले. तेव्हाच या डावाचा निकाल स्पष्ट झाला होता. चार चालींनंतर नॉर्वेचा खेळाडू कार्लसन याने बरोबरी मान्य केली. काळय़ा मोहऱ्यांच्या साहाय्याने तो खेळत असल्यामुळे ही बरोबरी त्याला फलदायीच ठरली. आनंदला २५ चालींकरिता ४२ मिनिटांचा कालावधी लागला तर कार्लसन याने तेवढय़ाच चालींकरिता २५ मिनिटे घेतली.
आनंदने यापूर्वी चीनचा खेळाडू दिंग लिरेनविरुद्ध कारोकान बचाव पद्धतीचा उपयोग केला होता. त्या वेळी त्याला झटपट विजय मिळाला होता. मात्र कार्लसनच्या भक्कम बचावापुढे आनंदची मात्रा यशस्वी ठरली नाही.
“वजिरा-वजिरी करीत आनंदला फारसे काही साध्य झाले नाही. त्याने जे काही डावपेच अपेक्षित केले होते, त्यामध्ये मला किती धोका निर्माण होणार आहे याचा मी बारकाईने गृहपाठ केला होता. त्यामुळे वजिरा-वजिरीनंतर होणाऱ्या डावपेचांची मी जय्यत तयारी केली होती. आव्हानवीर ठरविण्यासाठी झालेल्या लढतींच्या वेळी मी अशा डावपेचांना सामोरे गेलो होतो. त्यामुळे येथे मला अडचण आली नाही. आव्हानवीर स्पर्धेतही काळ्या मोहरांच्या साहाय्याने खेळताना मी दोनतीन डाव असेच बरोबरीत सोडविले होते. आनंद हा महान खेळाडू आहे. त्याने माझ्या अनेक स्पर्धकांविरुद्ध विजय मिळविले आहेत. तो अतिशय बलाढय़ स्पर्धक आहे.”
मॅग्नस कार्लसन
“कार्लसन याने केलेल्या सुरुवातीच्या चाली माझ्यासाठी अनपेक्षित होत्या. १२ व्या चालीनंतर डावातील गुंतागुंत वाढत गेली. हे डावपेच माझ्यासाठी अनपेक्षित होते. वजिरा-वजिरीनंतर मला योग्य अशी व्यूहरचना मिळत नाही हे लक्षात आल्यानंतर मी बचावावरच भर दिला. आणखी खेळत राहिलो तर आपल्याला धोका निर्माण होऊ शकतो याची जाणीव झाल्यामुळेच मी बरोबरीवर भर दिला. पहिल्या दोन डावांमध्ये मिळून जेमतेम ४१ चालींचा खेळ झाला आहे. त्यामुळे एकमेकांच्या डावपेचांचा अंदाज आलेला नाही. तथापि नंतरचे डाव अतिशय अव्वल दर्जाचे होतील अशी मला खात्री
आहे. पहिल्या पंधरा चालींपर्यंत मी वेगवेगळ्या डावपेचांचा पर्याय शोधत होतो. तथापि त्याने भक्कम बचाव सुरू केल्यानंतर मलाही बरोबरीचाच विचार करावा लागला. “
विश्वनाथन आनंद