जगज्जेत्या विश्वनाथन आनंदच्या आक्रमक खेळाची फटकेबाजी पाहण्यासाठी चेन्नईमधील पंचतारांकित हॉटेलमध्ये आणि इंटरनेटवर गर्दी करणाऱ्या प्रेक्षकांची घोर निराशा झाली, कारण आनंद पांढरी मोहरी घेऊन तडाखेबंद खेळण्यासाठी प्रसिद्ध आहे. माझ्या मते शनिवारी मॅग्नस हादरलेला होता. त्याच्या डळमळीत झालेल्या आत्मविश्वासाला संजीवनी देण्याचे काम आनंदच्या आजच्या ‘धीरे चलो’ खेळाने केले.
आनंदविरुद्धच नव्हे तर बहुतेक वेळा काळ्या मोहरी घेऊन खेळताना मॅग्नस हल्ली राजाच्या पुढचे प्यादे पुढे ढकलतो. आज त्याने हिराशिओ कारो आणि इल्या कान्न या दोन खेळाडूंच्या नावाने प्रसिद्ध असलेल्या प्रकाराने बचाव सुरू केला. यापूर्वी १९६१ साली जगज्जेतेपदाच्या लढतीमध्ये आक्रमक खेळासाठी नावाजलेल्या मिखाईल तालला नामोहरम करण्यासाठी मिखाईल बोटविन्निकने याच बचावाचा आश्रय घेतला होता.
पहिल्या दहा खेळ्यानंतर आनंदची परिस्थिती इतकी चांगली वाटत होती की प्रेक्षकांमध्ये उत्सुकता ताणली गेली. त्याची लागण प्रेक्षकांना डावाची माहिती देणाऱ्या निवेदकांना पण लागली. त्यांनी आनंदला आता कसे हल्ले चढवता येतील याची प्रात्यक्षिके देण्यास सुरुवात केली. आता मॅग्नस काय करतो याची सर्वाना उत्सुकता लागून राहिली होती. १५ व्या खेळीत आपला घोडा पुढे आणण्याची चूक आनंदला नडली. अशा वेळी मॅग्नसने आज आपण जगातील सर्वोत्तम खेळाडू का मानले जातो याचे प्रात्यक्षिक सर्वाना दिले. त्याने आधी आनंदच्या आक्रमक घोडय़ांचा काटा काढला. मग पटाच्या मध्यावर बसून त्याच्या राजावर किरण साधणाऱ्या वजिरावर आपला वजीर टाकून त्याने आनंदला आपल्या राजावर चालून येण्याचे आव्हान दिले. आता आनंद खोडय़ात सापडला होता. आपला हल्ला यशस्वी होणे शक्य नाही, विशेषकरून आपल्या आक्रमक सन्याची दाणादाण उडाल्यावर! हे त्याला लक्षात आले आणि त्याने वजिरावजिरी केली आणि अवघ्या सव्वा तासात प्रेक्षक आपापल्या घरी परतले.    
आज आपण कारोकान्न बचावाविरुद्ध विशेष तयारी केली नव्हती असे विश्वविजेत्या आनंदने सांगितले. त्यामध्ये काही तथ्य नाही. आव्हानवीर मॅग्नसला गाफील ठेवणे हासुद्धा त्याचा एक उद्देश असू शकेल. या संदर्भामध्ये मला विक्टर कोर्चनोय आणि लेव पोलुगेवास्की यांच्यामधील सामन्याची आठवण होते. कोर्चनोयने लेवच्या आवडत्या बचावाविरुद्ध खूप तयारी केली होती, पण संशय आला तर लेव आपले डावपेच बदलेल म्हणून धूर्त विक्टरने सुरुवातीपासून बुचकळ्यात पडल्याचे नाटक केले आणि सुरुवातीच्या १५ खेळ्या करण्यासाठी तब्बल दीड तास घेतला. बिचारा लेव! त्याने आपल्या तयार खेळ्या पटापट देण्यास सुरुवात केली आणि स्वतला हवी ती परिस्थिती आल्यावर विक्टरने अचानक आपली घरी तयार केलेली खेळी काढली आणि गडबडलेल्या लेवची दाणादाण उडवून दिली. आनंदचे साहाय्यक आता रात्रीचा दिवस करून चौथ्या डावामध्ये मॅग्नस विरुद्ध व्यूहरचना करतील.
एक दिवसाच्या विश्रांतीनंतर मॅग्नस पांढऱ्या मोहरी घेऊन काय करतो, याची सर्वाना उत्सुकता लागली आहे. आजच्या बरोबरी नंतर सामन्याचे पारडे पुन्हा एकदा मॅग्नसकडे थोडे झुकले आहे. सोमवारी माजी जगज्जेता गॅरी कास्पारोव चेन्नईमध्ये येत आहे. एके काळी मॅग्नसचा प्रशिक्षक असणारा गॅरी त्याच्याच मदतीसाठी पुन्हा तर धावून येत नाही ना अशी शंका अनेकांच्या मनात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा