मुंबई : दोम्माराजू गुकेशने गेल्या काही काळात केलेली कामगिरी कौतुकास्पद आहे. सध्याची लय पाहता, जागतिक अजिंक्यपदाच्या लढतीत गुकेशचे पारडे जड मानले जाऊ शकते. मात्र, विद्यामान जगज्जेत्या डिंग लिरेनकडून कडवा प्रतिकार सहन करावा लागणार याचीही गुकेशला जाण आहे. त्यामुळे तो पूर्ण तयारीनिशीच या लढतीत उतरेल, असे मत भारताचा दिग्गज बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदने व्यक्त केले.

यंदा २५ नोव्हेंबर ते १३ डिसेंबर या कालावधीत सिंगापूर येथे बुद्धिबळ जगज्जेतेपदाची लढत खेळवली जाणार आहे. काही महिन्यांपूर्वी कॅनडा येथे झालेली प्रतिष्ठेची ‘कँडिडेट्स’ स्पर्धा जिंकून गुकेशने विद्यामान जगज्जेत्या चीनच्या लिरेनला आव्हान देण्याची संधी मिळवली. तो बुद्धिबळाच्या इतिहासातील सर्वांत युवा आव्हानवीर ठरणार आहे. गुकेशने नुकत्याच झालेल्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेतही सर्वांत अवघड मानल्या जाणाऱ्या पहिल्या पटावर खेळताना वैयक्तिक सुवर्णपदकाची कमाई केली. या स्पर्धेदरम्यान भारतीय पुरुष संघाची चीनशी लढत झाली. मात्र, या लढतीत गुकेशविरुद्ध खेळणे लिरेनने टाळले. लिरेनला गेल्या काही महिन्यांत फारसे यश मिळवता आलेले नाही. जागतिक क्रमवारीतही त्याची १५व्या स्थानी घसरण झाली आहे. त्याच वेळी गुकेश क्रमवारीत सातव्या स्थानावर आहे.

हेही वाचा >>>IND vs BAN: दुसऱ्या कसोटीत ९३ टक्के पावसाची शक्यता, कानपूरचू खेळपट्टी कोणाला करणार मदत? वाचा हवामान आणि पिच रिपोर्ट

‘‘अलीकडच्या काळातील दोन्ही खेळाडूंची लय पाहता गुकेशचे पारडे निश्चितपणे जड मानले जाऊ शकते. मात्र, लिरेन जगज्जेता आहे हे विसरून चालणार नाही. तो गुकेशला सहजासहजी विजय मिळवू देणार नाही. गुकेशलाही हे ठाऊक आहे. त्यामुळे तो लिरेनला कमी लेखण्याची चूक अजिबातच करणार नाही. या लढतीदरम्यान येणाऱ्या आव्हानांसाठी तो सज्ज असेल,’’ असे आनंदने ‘लोकसत्ता’ला सांगितले. तसेच जगज्जेतेपदाच्या लढतीसाठी आवश्यक तयारी करता यावी याकरिता गुकेश ग्लोबल चेस लीगच्या आगामी हंगामात खेळणार नसल्याचेही आनंद म्हणाला.

ग्लोबल चेस लीगचा दुसरा हंगाम ३ ऑक्टोबरपासून लंडन येथे खेळवला जाणार आहे. त्या दृष्टीने ‘मुंबई क्रीडा पत्रकार संघटने’च्या वतीने गुरुवारी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आनंदने या लीगसह ऑलिम्पियाड स्पर्धेतील भारताचे ऐतिहासिक दुहेरी सुवर्णयश आणि भारतीय बुद्धिबळाचे भविष्य अशा विविध विषयांवर भाष्य केले. या कार्यक्रमाला लीगचे मुख्य कार्यकारी अधिकारी समीर पाठक आभासी पद्धतीने, तर लीगचे सहसंस्थापक पराग शहा प्रत्यक्ष उपस्थित होते.

हेही वाचा >>>Shakib Al Hasan: शकिब अल हसनने कसोटी आणि टी-२० क्रिकेटमधून जाहीर केली निवृत्ती, म्हणाला, “…नाही तर भारताविरूद्धची टेस्ट अखेरचा सामना”

‘‘ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केलेल्या सर्वच बुद्धिबळपटूंना मी बऱ्याच वर्षांपासून ओळखतो. त्यामुळे त्यांच्यासाठी मी खूप खूश होतो. एकाच ऑलिम्पियाड स्पर्धेत पुरुष आणि महिला या दोनही संघांनी सुवर्णपदक जिंकणे, हे आपल्या देशासाठी खूप मोठे यश आहे. मी खेळाडू म्हणून, चाहता म्हणून आणि एक भारतीय म्हणून या जेतेपदाचा आनंद घेतला. मी त्या ठिकाणी उपस्थित होतो. सर्व खेळाडूंनी मला करंडक उंचावण्यास सांगितले. माझ्यासाठी तो खूप खास क्षण होता. आपले दोन्ही संघ सुवर्णपदक जिंकल्याने देशाचे राष्ट्रगीत एकदा नव्हे, तर दोनदा लावले गेले. त्यावेळी खूप छान वाटले,’’ अशी भावना पाच वेळच्या विश्वविजेत्या आनंदने व्यक्त केली.

आनंदने मांडलेले अन्य मुद्दे

● चेन्नईत झालेल्या गेल्या ऑलिम्पियाडमध्येही दोन सुवर्णपदकांच्या अगदी जवळ होतो. पुरुष संघाला अखेरच्या लढतीत केवळ बरोबरीची आवश्यकता होती. महिला संघही अखेरच्या फेरीपर्यंत आघाडीवर. मात्र, अखेरीस सुवर्णपदकाची हुलकावणी.

● यंदाच्या ऑलिम्पियाड स्पर्धेत चौथ्या फेरीनंतरच भारतीय पुरुष संघाला कोणीही हरवू शकणार नसल्याचे स्पष्ट झाले. दुसऱ्या क्रमांकावरील संघापेक्षा चार गुण अधिक असणे हे अविश्वसनीयच.

● महिला संघाचा अधिक कस. अखेरच्या काही फेऱ्या शिल्लक असताना एक पराभव पत्करावा लागल्याने गुणतालिकेत अर्ध्या गुणाने मागे. मात्र, दमदार पुनरागमनासह सुवर्णपदक कमावणे खूपच खास.

● भारतात बुद्धिबळाची अधिक प्रगती होण्यासाठी मुलींचा सहभाग वाढणे गरजेचे. याच कारणास्तव ऑलिम्पियाड स्पर्धेतील भारताच्या महिला संघाचे सुवर्णयश अत्यंत महत्त्वाचे.

● गुकेश, प्रज्ञानंद, अर्जुन एरिगेसी आणि विदित गुजराथी यांच्यामुळे भारतीय बुद्धिबळ भक्कम स्थितीत. आता जगज्जेतेपदाचे ध्येय आवश्यक.