नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसन याने विद्यमान विश्वविजेत्या विश्वनाथन आनंद याच्यावर मात करीत विश्वविजेतेपद मिळविले असले तरी आनंदची कारकीर्द संपलेली नाही; उलट तो आता अधिक जोमाने जागतिक स्तरावर खेळेल, हे मत व्यक्त केले आहे आंतरराष्ट्रीय मास्टर व प्रशिक्षक जयंत गोखले यांनी.
जयंत गोखले यांनी आतापर्यंत अनेक आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धामध्ये अव्वल दर्जाचे यश संपादन केले आहे. आकांक्षा हगवणे, अभिमन्यु पुराणिक यांच्यासारख्या खेळाडूंना त्यांचे मार्गदर्शन लाभले आहे. बावन्न रविवार जलद बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करीत त्यांनी अनेक नवोदित खेळाडूंच्या कारकिर्दीस चालना दिली आहे. चेन्नई येथे नुकत्याच झालेल्या आनंद व कार्लसन यांच्यातील लढतीविषयी त्यांनी ‘लोकसत्ता’ प्रतिनिधीशी मनमोकळेपणाने गप्पागोष्टी केल्या.
कार्लसनविरुद्धच्या पराभवामुळे आनंदचे साम्राज्य खालसा झाले आहे असे तुम्हाला वाटते का?
या लढतीमधील पराभवामुळे आनंदची कारकीर्द संपली असे मुळीच म्हणता येणार नाही. बोरीस गेल्फंडविरुद्ध विश्वविजेतेपद मिळविल्यानंतर गेल्या दोन वर्षांमध्ये आनंदला आंतरराष्ट्रीय स्तरावर अपेक्षेइतकी अव्वल दर्जाची कामगिरी करता आली नव्हती. त्यातही कार्लसन याने आव्हानवीर ठरविण्यासाठी झालेली स्पर्धा जिंकल्यानंतर आनंदवर दडपण आले होते. कार्लसन याने गॅरी कास्पारोव्ह याचा विक्रम मोडून जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान घेतले होते. कार्लसन हा युवा खेळाडू असला तरी तो खरोखरीच विजेतेपदासाठी असलेला योग्यच खेळाडू आहे. विश्वविजेतेपद पुन्हा योग्य व लायक खेळाडूकडेच गेले आहे.
स्वत:च्या गावात खेळल्यामुळे आनंदवर मानसिक दडपण आले होते काय?
आनंदवर घरचे कसलेच दडपण नव्हते. कारण तो अतिशय व्यावसायिक खेळाडू आहे. या लढतीकरिता त्याने आपल्या घरी न राहता हॉटेलमध्येच राहणे पसंत केले होते. कार्लसनविरुद्ध त्याने यापूर्वी अनेक डाव खेळले होते, मात्र विश्वविजेतेपदाची लढत काही औरच असते. तेथे आपला प्रतिस्पर्धी केव्हा व कोणती व्यूहरचना करील याचा थांगपत्ता लागत नाही. कार्लसन हा जागतिक क्रमवारीतील नंबर वन खेळाडू असल्यामुळे त्याच्या या स्थानाचेच थोडेसे दडपण आनंदवर आले होते.
आनंदच्या पराभवाची नेमकी काय कारणे सांगता येतील?
या लढतीत आनंदने मिळालेल्या संधीचा अपेक्षेइतका लाभ घेतला नाही. त्याने या संधींचा पुरेपूर फायदा घेतला असता तर कदाचित लढतीस कलाटणी मिळाली असती. तिसऱ्या डावात आनंदला विजय मिळविण्यासाठी योग्य अशी व्यूहरचना मिळाली होती. हा डाव त्याने घेतला असता तर त्याचा आत्मविश्वास वाढला असता. चार तासापेक्षा जास्त वेळ डाव चालला तर आनंदच्या खेळात काही नकळत चुका होऊ शकतात, याचा कार्लसन याने बारकाईने अभ्यास केला होता. डावाच्या शेवटच्या टप्प्यात आनंदकडून अपेक्षेइतक्या सर्वोत्तम चाली झाल्या नाहीत. त्याचाही फायदा कार्लसनला झाला.
आनंदच्या पराभवामुळे अन्य खेळाडूंच्या प्रायोजकत्वावर अनिष्ट परिणाम होईल असे तुम्हाला वाटते का?
खरंतर या लढतीमुळे बुद्धिबळ हा भारतात घराघरात पोहोचला आहे असे म्हटले तर ते फारसे वावगे ठरणार नाही. प्रत्येक डावाचे थेट प्रक्षेपण दूरदर्शनने केल्यामुळे घराघरात याच लढतीविषयी चर्चा ऐकावयास मिळत होती. देशातील बहुतांश बुद्धिबळपटू या लढतीचे थेट प्रक्षेपण दूरदर्शन किंवा इंटरनेटद्वारे पाहत होते. सर्वच प्रसारमाध्यमांनी या लढतीस भरपूर प्रसिद्धी दिल्यामुळे या खेळाची लोकप्रियता वाढली आहे. त्याचा फायदा या खेळास निश्चित होणार आहे.
जागतिक स्तरावरील स्पर्धामध्ये पुन्हा चमक दाखविण्याची आनंदचे काय प्रयत्न असतील?
गेले दोन वर्षे आनंदवर या लढतीचे दडपण होते. आता लढत संपली असल्यामुळे तो अधिक मनमोकळेपणाने खेळेल अशी खात्री आहे. मार्चमध्ये आव्हानवीरासाठी स्पर्धा होणार आहे. त्यामध्ये आनंद अधिक जोमाने भाग घेईल. तोपर्यंत त्याला विश्वविजेतेपदाच्या लढतीत झालेल्या चुकांचा बारकाईने अभ्यास करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे.
कार्लसनच्या विजेतेपदामुळे जागतिक बुद्धिबळ क्षेत्रात काही बदल दिसून येतील काय?
कार्लसन याने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान घेतल्यानंतर विश्वविजेतेपद मिळविले आहे. त्याने आव्हानवीरासाठी झालेल्या स्पर्धेद्वारे विश्वविजेतेपदाच्या लढतीत स्थान मिळविले. युवा खेळाडूही ‘विश्वविजेता’ होऊ शकतो हे त्याने दाखवून दिले आहे. आक्रमण हाच भक्कम बचाव असतो हेही त्याने सिद्ध केले आहे. त्याच्याकडून नवोदित खेळाडूंना भरपूर प्रेरणा मिळणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा