प्रो-कबड्डीने भारतीय मातीत खेळला जाणाऱ्या कबड्डीला जागतिक स्तरावर नेऊन ठेवलं. सात-सुमद्रापार देशांनी यामुळे कबड्डीची दखल घेतली. पहिली ४ पर्व लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवल्यानंतर प्रो-कबड्डीची पाचव्या पर्वाची सुरुवातही धडाकेबाज पद्धतीने झालेली आहे. यंदाच्या पर्वात ४ नवीन संघाचा स्पर्धेत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या स्पर्धेची व्याप्ती वाढवून ३ महिन्यांची करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्पर्धेचा कालावधी वाढवला गेल्याने यंदा प्रो-कबड्डीला प्रतिसाद मिळेल की नाही अशी शंका अनेकांनी वर्तवली होती. मात्र या सर्व शंकांना मागे सारत प्रो-कबड्डीने पाचव्या पर्वाच्या पहिल्याच दिवशी तब्बल ५ कोटी लोकांच्या घरात प्रवेश केला आहे. चौथ्या पर्वाच्या तुलनेत पाचव्या पर्वाच्या पहिल्या दिवशीच्या प्रेक्षकसंख्येत तब्बल ५९ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

प्रत्येक राज्याचा विचार केला असता, कर्नाटकमध्ये प्रो-कबड्डीच्या पाचव्या पर्वात जास्त प्रेक्षकवर्ग मिळाला आहे. चौथ्या पर्वाच्या तुलनेत कर्नाटक राज्यात पाचव्या पर्वाचा पहिला सामना बघणाऱ्या प्रेक्षकांच्या संख्येत तब्बल १३७ टक्के वाढ झाली आहे. कर्नाटक सारख्या राज्यात कबड्डीला मिळणारा हा प्रेक्षकवर्ग अत्यंत लक्षणीय बाब मानली जात आहे. याव्यतिरीक्त आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्राच्या प्रेक्षकवर्गात अनुक्रमे ४८ आणि २२ टक्के लाढ झालेली आहे. इतर वाहिन्यांच्या तुलनेत प्रो-कबड्डीचं प्रसारण करणाऱ्या स्टार स्पोर्ट्स पाचव्या पर्वाच्या पहिल्या दिवशी तब्बल २३ टक्के प्रेक्षकवर्ग आपल्याकडे खेचला होता. त्यामुळे या हंगामातही प्रो-कबड्डीला प्रेक्षकवर्ग तितकाच चांगला प्रतिसाद देईल असा विश्वास स्टार इंडियाचे एमडी संजय गुप्ता यांनी व्यक्त केला आहे.