”पहिल्यांदा मी बंगालकडून खेळायचो. पन गावाकडं ते कोनाला आवडायचं नाय. मला माझे सगळे मित्र आणि गावातली लोकं बोलायची की तू मुंबईच्या टीमकडून का खेळत नाही? पण त्यांना प्रत्येकवेळा कसं समजवायचं, की माझं सिलेक्शन बंगालकडून झालंय. पण आता सगळी लोकं जाम खूश आहेत. मुंबईच्या टीममध्ये सिलेक्शन झाल्यानंतर सगळ्या लोकांनी मेसेज करुन आणि घरी येऊन मला शुभेच्छा दिल्या.” आपल्या आवडत्या संघाकडून खेळायला मिळणार याचा आनंद नितीनच्या बोलण्यात जाणवत होता. आपल्या अस्सल गावरान भाषेत नितीन प्रो-कबड्डीतल्या नवीन प्रवासाबद्दल बोलत होता. प्रो-कबड्डीच्या पाचव्या हंगामान नितीन मदने आणि काशिलींग अडके यांची यू मुम्बाच्या संघात निवड झाली आहे. यावेळी दोन्ही सांगलीकरांनी खास ‘लोकसत्ता ऑनलाईन’शी गप्पा मारल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बंगाल वॉरियर्सच्या संघात नितीन मदने महाराष्ट्राच्या निलेश शिंदेच्या नेतृत्त्वाखाली खेळत होता. मात्र निलेश आणि अनुप कुमार यांच्यात चांगला कर्णधार कोण असं विचारलं असता, दोन खेळाडूंची तुलना करण चुकीचे आहे. कबड्डीत प्रत्येक सामन्यात नवीन खेळाडूंना सूर सापडत असतो. त्यामुळे निलेश शिंदेसारख्या सिनियर खेळाडूच्या हाताखाली खेळताना मला मजा आली. अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. मात्र अनुप कुमार हा कबड्डीतला परिपूर्ण कर्णधार आहे. या खेळाडूत इतकी ताकद आहे की तो मैदानात कधीही थकताना दिसत नाही. कित्येकदा आम्हाला सरावाचा कंटाळा येतो, पण अनुप आपला सराव चालू ठेवतो. मग अशावेळी आपला कर्णधार सराव करतोय म्हटल्यावर आम्हालाही मैदानात उतरण भाग पडतं. अनुपकडून ही उर्जा प्रत्येक खेळाडूने घेण्यासारखी असल्याचं नितीन मदने म्हणाला.

”सरावादरम्यान अनुपचं प्रत्येकाकडे बारीक लक्ष असतं. मी रेड टाकत असताना बोनस पॉईंट घेताना माझा मागचा पाय उचलला जात नाही. अनुपने माझ्यातही की कमतरता हेरत माझ्याकडून चांगला सराव करुन घेतला. कित्येकदा समोरच्या खेळाडूला एखादी गोष्ट समजावून सांगायची असेल तर अनुप कुमार स्वतः १०-१२ रेड करतो.” नितीन आपल्या नवीन कर्णधाराबद्दल भरभरुन बोलत होता. देहरादूनमध्ये सराव शिबिर आटोपून यू मुम्बाचा संघ सध्या मुंबईत दाखल झाला आहे. यावेळी देहरादूनसारख्या ठिकाणी संघाचा सराव करुन घेण्यामागचं हेतू, त्याचा प्रत्यक्ष सामन्यादरम्यान होणारा फायदा याबद्दल मुंबईच्या प्रशिक्षकांनी चांगला विचार करुन ठेवला असल्याचं नितीनने सांगितलं. देहरादूनच्या सरावात ऑक्सिजन कमी असलेल्या जागी आम्ही सराव केला, त्यामुळे १०-१२ रेडमध्ये आम्ही सर्व जण थकायचो. पण आज मुंबईत सराव करताना आमच्या सगळ्यांमधली क्षमता अचानक वाढली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष सामने खेळताना याचा आपल्याला फायदा होणार असल्याचं नितीनचं म्हणणं आहे.

सांगलीच्याच कासेगावचा काशिलींग अडके मात्र यंदा बऱ्याच प्रमाणात खूश आहे. दबंग दिल्लीच्या संघात बचावापासून रेडींगपर्यंतची जबाबदारी काशिलींगवर यायची. त्यामुळे बऱ्याच वेळा दबावाखाली काशिलींगला आपला खेळ सुधारता येत नव्हता. मात्र, यंदाच्या पर्वात अनुप कुमार, शब्बीर बापू, नितीन मदने यांच्यासारखे तगडे खेळाडू सोबत असल्यामुळे आपला खेळ अधिकाधिक सुधारण्यावर भर देता येईल, असं काशिलींग म्हणाला.

दबंग दिल्ली ते यू मुम्बा हा प्रवास खूप स्वप्नवत होता. मुंबईच्या संघाकडून खेळायला मिळणं हे प्रत्येकाचं स्वप्न होतं. आपलही ते स्वप्न पूर्ण झाल्याने काशिलींगची स्वारी खूश होती. प्रो-कबड्डीने खेळाडू म्हणून प्रत्येकाच्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणला असल्याचं काशिलींग म्हणाला. काशिलींग सांगलीच्या कासेगावात ज्ञानदेव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खेळतो. प्रो-कबड्डी सुरु झाल्यानंतर गावात मॅट आली आहे. मात्र, अजुनही आम्ही मातीच्या मैदानातच सराव करत असल्याचं काशिलींग म्हणाला. मात्र हळूहळू हे बदल घडतील आणि अधिकाधिक खेळाडू कबड्डीकडे वळतील, असं काशिलींगचं म्हणणं आहे.

भारताच्या कबड्डी संघात महाराष्ट्राच्या खेळाडूंना योग्य ती संधी मिळत नाही, असं विचारल्यावर काशिलींग म्हणला, ”प्रत्येक खेळाडूंचे काही कच्चे दुवे असतात तर काही पक्के. प्रत्येक राज्याचा खेळाडू हा त्याच्या अंगातल्या गुणांमुळे संघात असतो. जेव्हा आम्ही देशासाठी खेळत असतो तेव्हा आमच्या मनात कधीही आमच्या राज्याचा विचार येत नाही, सर्वप्रथम आम्ही आमच्या देशाचं प्रतिनिधित्व करत असतो ”, असं काशिलींग म्हणाला.

प्रो-कबड्डीच्या सलग तीन पर्वांच्या अंतिम फेरीत प्रवेश करणारा यू मुम्बा हा एकमेव संघ ठरला आहे. चौथ्या पर्वात मूम्बाला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. मात्र यंदा अनुपच्या जोडीला महाराष्ट्राचे काशिलींग आणि नितीन मदने हे खंदे वीर मैदानात उतरले आहेत. त्यामुळे यंदा जीवाची बाजी लावून पुन्हा एकदा यू मुम्बाला ट्रॉफी मिळवून देण्याचा निर्धार सांगलीच्या दोन्ही पठ्ठ्यांनी केला आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vivo pro kabbadi league 2017 kashiling adke and nitin madne shares their experience about u mumba and pro kabaddi league