मुंबईकर फलंदाज श्रेयस अय्यरने पदार्पणाच्या कसोटी सामन्यात उत्कृष्ट फलंदाजी केली आहे. कानपूरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध पदार्पण करताच त्याचे अर्धशतक झळकले. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा तो ७५ धावांवर नाबाद होता. अशा स्थितीत अय्यरबाबतही वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, भारताचा माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणनेही एक वक्तव्य केले आहे.

स्टार स्पोर्ट्सवरील व्हीव्हीएस लक्ष्मण म्हणाले की, ”श्रेयस अय्यरने जवळजवळ २ वर्षांपूर्वी शेवटचा प्रथम श्रेणी सामना खेळला. लाल चेंडूच्या क्रिकेटची मानसिकता कोणत्याही युवा खेळाडूसाठी सर्वात कठीण आव्हान असते. त्याने कोणत्याही बाबतीत तडजोड केली नाही. कानपूर कसोटीत तो मुंबई किंवा भारत अ संघाकडून खेळतो तसाच खेळला.”

पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा लक्ष्मणने अय्यरबाबत भातीही व्यक्त केली. मुंबईत होणाऱ्या भारत-न्यूझीलंडमधील दुसऱ्या कसोटीत अय्यरला संघात स्थान मिळेल का, याबाबत लक्ष्मणला खात्री नाही. या कसोटीत भारताचा नियमित कर्णधार विराट कोहलीचे पुनरागमन होणार आहे, त्यामुळे त्याची जागा भरली जाणार असल्याने श्रेयस संघात असण्याबाबत प्रश्नचिन्ह आहेत.

हेही वाचा – IPL 2022 : धक्कादायकच..! रोहितच्या ‘विश्वासू’ खेळाडूला मुंबई इंडियन्स दाखवणार संघाबाहेरचा रस्ता!

लक्ष्मण म्हणाला, “श्रेयसने हा एक संस्मरणीय कसोटी सामना बनवावा, अशी माझी इच्छा आहे, कारण विराट कोहली एकदा परत आला की तो इलेव्हनमध्ये खेळेल याची शाश्वती नाही. त्यामुळे मला आशा आहे, की तो त्याच्या क्षमतेनुसार खेळेल.” श्रेयस अय्यर आणि रवींद्र जडेजा भारताला पहिल्या डावात मोठ्या धावसंख्येपर्यंत नेण्याचा प्रयत्न करतील.

श्रेयसने संधीचा पुरेपूर वापर करत १३६ चेंडूंत ७ चौकार आणि २ षटकारांसह ७५ धावांची भक्कम खेळी केली. तर जडेजाने ६ चौकारांसह ५० धावांचे योगदान दिले. पहिल्या दिवसअखेर भारताने ४ बाद २५८ धावा अशी मजल मारली आहे.

Story img Loader