पंढरपुरात येऊनही माऊलींचे दर्शन झाले नाही तर वारकऱ्यांना हुरहुर लागते. अशीच काहीशी हुरहुर रॉजर फेडररला याचि देही याचि डोळा पाहण्यासाठी जमलेल्या टेनिसचाहत्यांना लागली. महेश भूपतीच्या इंटरनॅशनल प्रीमिअर टेनिस लीग स्पर्धेच्या दिल्लीपर्वाला शनिवारी दिमाखात सुरुवात झाली. मात्र फेडररची भारतवारी लांबल्याने दर्दी फेडरर चाहत्यांची अवस्था भेटी लागी जीवा.. अशी झालेली पाहायला मिळाली.
सतरा ग्रँडस्लॅम जेतेपदे, ऑलिम्पिक सुवर्णपदक आणि स्वित्र्झलडला डेव्हिस चषक मिळवून देणाऱ्या रॉजर फेडररने आधुनिक टेनिसमध्ये अढळस्थान निर्माण केले आहे. जेतेपदे आणि बलाढय़ यशसाम्राज्याचा हा शिलेदार कसा खेळतो हे पाहण्याची भारतीय टेनिस रसिकांमध्ये अमाप उत्सुकता आहे. मात्र मनिला आणि सिंगापूर टप्प्यात खेळू न शकलेल्या फेडररने चाहत्यांची प्रतीक्षा वाढवली आहे.
फेडररच्या विविध ग्रँडस्लॅम स्पर्धाची छबी असलेली छायाचित्रे, त्याला पाठिंबा देण्यासाठी घोषणा लिहिलेले फलक असा जामानिमा घेऊन बहुसंख्य प्रेक्षक दाखल झाले होते. मात्र फेडरर खेळणार नसल्याने सानिया मिर्झा- रोहन बोपण्णा या भारतीय चाहत्यांना समर्थन देण्यातच चाहत्यांना समाधान मानावे लागले.
जगभरच्या टेनिस चाहत्यांवर गारुड घालणाऱ्या फेडररला भारतात प्रत्यक्ष खेळताना पाहणे दुर्मीळ आहे. भारतात चेन्नई खुली टेनिस स्पर्धा ही एटीपी दर्जाची एकमेव स्पर्धा होते. मात्र त्यात आंतरराष्ट्रीय स्तरावरील दुसऱ्या फळीतले खेळाडू सहभागी होतात. भूपतीनिर्मित्ती लीगच्या माध्यमातून टेनिस चाहत्यांची फेडररला पाहण्याची इच्छा पूर्ण होणार आहे.
फेडररच्या सामन्यासाठी खास सुट्टी घेऊन आलो होतो, मात्र तो आज खेळणार नसल्याचे स्टेडियममध्ये आल्यावर समजले. तीनच दिवस ही स्पर्धा भारतात आहे, त्यातही एक दिवस फेडरर नसल्याने निराशा झाल्याचे गुरगावच्या प्रांजल कालराने सांगितले. एवढा अट्टहास ज्याच्यासाठी केला आहे तो उरलेल्या दोन दिवशी तरी निराशा करणार नाही, असे मनाला बजावत फेडररप्रेमींनी इंदिरा गांधी स्टेडियमचा निरोप घेतला.
दिल्ली चाट
टेनिस मेजवानीत भारनियमन महाराष्ट्राला भारनियमन नवीन नाही. मात्र पहिल्यावहिल्या लीगच्या निमित्ताने आलेल्या मंडळींना भारनियमन सहन करावे लागले. स्टेडियमच्या काही भागांमध्ये वीजपुरवठा सातत्याने खंडित होत होता. शंभरपेक्षा जास्त एकरवर पसरलेल्या इंदिरा गांधी इन्डोअर स्टेडियममध्ये लीगच्या आयोजनासाठी विविध यंत्रणा उभारण्यात आल्या. मात्र या यंत्रणांमध्ये सुसूत्रता नसल्याने वीजपुरवठा खंडित होण्यासारखे प्रकार पाहायला मिळाले.
सीट्सवरून गोंधळ
सिमेंट कट्टय़ावर प्लॅस्टिक सिट्स अशी या स्टेडियममध्ये प्रेक्षकांसाठी बसण्याची व्यवस्था आहे. मात्र सीट क्रमांक उजव्या बाजूला खुर्चीखाली लिहिलेला असल्याने बहुतांशी प्रेक्षकांना आपल्या आसनापर्यंत पोहचण्यात अडचणी येत होत्या. अनेकांनी मिळेल त्या जागेवर बसणे पसंत केले. मात्र त्या जागेचे तिकीट असलेल्या व्यक्ती आल्यावर आपली सीट शोधण्याचा खटाटोप करावा लागत होता.
भेटी लागी जीवा..
पंढरपुरात येऊनही माऊलींचे दर्शन झाले नाही तर वारकऱ्यांना हुरहुर लागते. अशीच काहीशी हुरहुर रॉजर फेडररला याचि देही याचि डोळा पाहण्यासाठी जमलेल्या टेनिसचाहत्यांना लागली.
First published on: 07-12-2014 at 03:55 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Waiting roger federer in iptl