ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत पदक मिळविण्यापेक्षाही त्यामधील सहभाग हा अधिक महत्त्वाचा असतो, असे आधुनिक ऑलिम्पिक चळवळीचे जनक बॅरन डी क्युबर्टिन असे नेहमी सांगत असत. भारतीय खेळाडूंनी अनेक वर्षे हे तत्त्व पाळले होते. कारण आपले खेळाडू पदकाला खूपच कमी महत्त्व देत असत. बीजिंग ऑलिम्पिकमध्ये अभिनव बिंद्राने ऐतिहासिक सुवर्णवेध घेतल्यानंतर मात्र भारताला पदकाचे महत्त्व कळले आहे असे वाटू लागले. कारण लंडनमध्ये यंदा सहा पदकांची कमाई करीत आपल्या देशाची या स्पर्धेत सकारात्मक वाटचाल सुरू झाली आहे.
अ‍ॅथेन्स ऑलिम्पिकमध्ये राज्यवर्धनसिंह राठोड याने नेमबाजीत रौप्यपदक मिळविल्यानंतर या खेळातही आपल्याला पदक मिळविता येते, हे आपल्या क्रीडा संघटकांना उमगले. त्यानंतर बीजिंगला अभिनवने नेमबाजीत सुवर्णपदक जिंकून देशास या स्पर्धेतील पहिले वैयक्तिक सुवर्णपदक मिळविण्याची किमया केली. या स्पर्धेतच भारताच्या सुशील कुमार (कुस्ती) व विजेंदर सिंग (बॉक्सिंग) यांनीही कांस्यपदकावर आपली मोहोर उमटवली. भारताला मिळालेले हे यश म्हणजे काही चमत्कार नव्हता, हे आपल्या खेळाडूंनी लंडन ऑलिम्पिकमध्ये दाखवून दिले. लंडनमध्ये आपल्या खेळाडूंनी दोन रौप्य व चार कांस्यपदकांची कमाई करीत कौतुकास्पद कामगिरी केली. विजय कुमार व सुशील कुमार यांनी अनुक्रमे नेमबाजी व कुस्तीत रौप्यपदकाला गवसणी घातली. एम. सी. मेरी कोम (बॉक्सिंग), योगेश्वर दत्त (कुस्ती), गगन नारंग (नेमबाजी) व सायना नेहवाल (बॅडमिंटन) यांनी कांस्यपदक प्राप्त केले.
अ‍ॅथेन्समध्ये राजवर्धनने रौप्यपदक मिळविल्यानंतर गेल्या आठ वर्षांमध्ये नेमबाजीकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक झाला आहे. या खेळात हमखास ऑलिम्पिकपदक मिळविता येते, याची जाणीव झाली आहे. त्यामुळेच की काय नेमबाजांच्या सामग्रीबाबतच्या समस्या दूर झाल्या आहेत. विजय कुमार याने पदार्पणातच ऑलिम्पिक पदक जिंकण्याची किमया केली. २५ मीटर रॅपिड फायर हा त्याचा आवडता क्रीडा प्रकार आहे. नेमबाजीत प्रत्यक्ष स्पर्धेचा दिवस महत्त्वाचा असतो व नशिबाचीही थोडीशी साथ असावी लागते. विजय कुमारच्या क्रीडा प्रकारात अनेक अनुभवी खेळाडूंचा समावेश होता. मात्र विजयने अतिशय संयम ठेवत अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत दुर्दैवाने त्याला सुवर्णपदक मिळविता आले नाही. मात्र रुपेरी यश मिळवीत त्याने आपले पदार्पण वैशिष्टय़पूर्ण ठरविले.
गगन नारंग हा नेमबाजीतील अव्वल दर्जाचा खेळाडू मानला जातो. त्याने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धामध्ये सुवर्णपदकांची लयलूट केली. त्याच्या या कामगिरीने त्याला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हा आपल्या देशातील सर्वोच्च सन्मानही मिळवून दिला, तरीही २००४पासून त्याला ऑलिम्पिक पदकाने हुलकावणी दिली होती. त्याचे ऑलिम्पिक पदकाचे अपुरे राहिलेले स्वप्न अखेर लंडन येथे साकार झाले. १० मीटर एअर रायफल या क्रीडाप्रकारात त्याने कांस्यपदक मिळवून ऑलिम्पिक पदकाचे स्वप्न प्रत्यक्षात साकार केले. विजय कुमार व नारंग यांच्या पदकाबरोबरच अभिनव व रंजन सोधी या दिग्गज नेमबाजांचे अपयशही चर्चेचा विषय ठरला. ऑलिम्पिक विजेत्या अभिनवला पात्रता निकषही पूर्ण करता आले नाहीत. त्याच्यासारखीच अवस्था सोधी याचीही झाली. आशियाई विजेता व विश्वविक्रमवीर असलेल्या सोधीला पात्रता निकष पार करता आले नाहीत.
जिद्द आणि जिगरबाज असा मेरी कोम हिला नावलौकिक लाभला आहे. महिलांच्या बॉक्सिंगमध्ये पाच वेळा विश्वविजेतेपद मिळविणाऱ्या मेरीचे एकच लक्ष्य होते, ते म्हणजे ऑलिम्पिक पदक. हे यश मिळविण्यासाठी गेली चार वर्षे ती अहोरात्र झगडत होती. दोन जुळी मुले असलेल्या मेरीने मणिपूरमध्ये आपल्या कुटुंबीयांसमवेत न राहता पुण्यात सराव करणे अधिक पसंत केले. २८ वर्षीय मेरीने केवळ ऑलिम्पिक पदकासाठी आपल्या नेहमीच्या वजनी गटाऐवजी वरच्या वजनी गटात भाग घेतला. जिद्द, महत्त्वाकांक्षा व आत्मविश्वास यांना अपार मेहनतीची जोड देत तिने ऑलिम्पिक पदकाचे स्वप्न साकार केले. भारतीय महिला ‘चूल आणि मूल’मध्ये न रमता ऑलिम्पिक पदक मिळवू शकते, हे तिने दाखवून दिले.
सायना ही कांस्यपदकाबाबत थोडीशी नशीबवान ठरली. कांस्यपदकाच्या लढतीत तिची प्रतिस्पर्धी खेळाडू झिन वाँग हिने पहिला गेम घेतल्यानंतर दुखापतीमुळे माघार घेतली. त्यामुळे सायनाच्या कांस्यपदकावर शिक्कामोर्तब झाले. अर्थात सायनाचे पदकही भूषणावह आहे. बीजिंग ऑलिम्पिकच्या वेळी नवोदित खेळाडू असूनही तिने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल गाठली होती. त्या फेरीत निर्णायक गेममध्ये आघाडीवर असूनही तिचा विजय हुकला होता. या पराभवाची कसर तिने बीजिंगमध्ये भरून काढली. सायना ही भारतीय क्रीडापटूंसाठी आदर्श खेळाडू मानली जाते. तिने मिळविलेले हे यश नवोदित खेळाडूंसाठी प्रोत्साहन देणारेच आहे.
सुशील कुमारचे कुस्तीमधील सुवर्णपदक हुकले मात्र लागोपाठ दोन ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक क्रीडा प्रकारात पदक मिळविणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू ठरला. बीजिंगमधील कांस्यपदक हे नशिबामुळे मिळाले नव्हते, हे त्याने दाखवून दिले. त्याचा सहकारी योगेश्वर दत्त याने मिळविलेले कांस्यपदकही वैशिष्टय़पूर्ण ठरले. लागोपाठ पाच लढती खेळताना त्याची पुरती दमछाक झाली होती. त्याच्या डोळ्यालाही दुखापत झाली होती, तरीही त्याने जिद्दीच्या जोरावर झुंज देत कांस्यपदकाला गवसणी घातली.
पुरुषांच्या बॉक्सिंगमध्ये आपल्या खेळाडूंना नशिबाची साथ नव्हती. केवळ पंचांच्या सदोष व पक्षपाती निर्णयाचा फटका आपल्या खेळाडूंना बसला, अन्यथा या खेळात आपल्याला किमान दोन कांस्यपदकांची कमाई झाली असती. हॉकी व अ‍ॅथलेटिक्समधील दारुण अपयश हा स्वतंत्र चर्चेचा विषय आहे. या खेळांमध्ये पदक मिळविण्यासाठी आपल्या खेळाडूंना अपार मेहनत करावी लागणार आहे. बीजिंगमधील तीन पदके व लंडन येथील सहा पदकांच्या पाश्र्वभूमीवर २०२०मध्ये आपले खेळाडू ऑलिम्पिक स्पर्धेत किमान पंधरा पदके मिळवतील अशी आशा करायला हरकत नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा