इंग्लंडसाठी पन्नासावा गोल
जागतिक फुटबॉल क्षेत्रातील अव्वल दर्जाचा खेळाडू म्हणून ख्याती मिळविलेल्या वेन रुनीने इंग्लंडसाठी आपले गोलांचे अर्धशतक पूर्ण केले, त्यामुळेच इंग्लंडला युरो फुटबॉल स्पर्धेच्या पात्रता फेरीत स्वित्र्झलडवर २-० असा विजय मिळवता आला.
इंग्लंडने यापूर्वीच या स्पर्धेच्या मुख्य फेरीत स्थान मिळवले आहे. तरीही रुनी याच्या कामगिरीबाबत उत्कंठा निर्माण झाली होती. त्याने ५० गोल करीत बॉबी चार्लटन यांनी केलेल्या ४९ गोलांचा विक्रम मोडला. बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरलेल्या हॅरी केनने गोलशून्य बरोबरीची कोंडी फोडून इंग्लंडला १-० अशी आघाडी मिळवून दिली. सामन्याची शेवटची सात मिनिटे बाकी असताना रुनी याने पेनल्टी किकचा फायदा घेत प्रतिस्पर्धी गोलरक्षक युआन सोमेरला चकविले आणि गोल नोंदविला.
‘‘हा गोल माझ्यासाठी अतिशय संस्मरणीय आहे. गेल्या काही सामन्यांमध्ये मी हे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न करीत होतो. येथे हे स्वप्न साध्य झाल्यामुळे मला खूप आनंद झाला आहे,’’ असे रुनी म्हणाला.
चार्लटन यांनी रुनीचे अभिनंदन करीत सांगितले, इंग्लंडसाठी पन्नास गोल करणे ही काही सोपी गोष्ट नाही. रुनी याने सुरेख कौशल्य दाखविले आहे. त्याच्यावर इंग्लंडची खूप मदार आहे. युरो स्पर्धेच्या मुख्य फेरीतही तो अशीच शानदार कामगिरी करील अशी मला खात्री आहे.
इंग्लंडचे व्यवस्थापक रॉय हॉजसन म्हणाले, रुनीच्या कामगिरीबद्दल मला खूप अभिमान वाटत आहे. त्याच्या खेळात आलेली परिपक्वता पाहून मी समाधानी आहे. त्याने अशीच सातत्यपूर्ण कामगिरी करीत संघास उज्ज्वल यश मिळवून देत राहावे अशी माझी इच्छा आहे.