Wanindu Hasaranga created history by taking five wickets in three consecutive matches: झिम्बाब्वे येथे खेळल्या जात असलेल्या विश्वचषक २०२३ च्या पात्रता फेरीत रविवारी श्रीलंका आणि आयर्लंड संघात सामना झाला. या सामन्यात श्रीलंकेने आयर्लंडचा १३३ धावांनी पराभव केला. या सामन्यात श्रीलंकेच्या फिरकीपटू वानिंदू हसरंगाने शानदार गोलंदाजी करताना ५ बळी घेतले. हसरंगाने यासह संघाला विजय तर मिळवून दिलाच, पण एक मोठा विक्रमही आपल्या नावावर केला.
वानिंदू हसरंगा केला हा पराक्रम –
श्रीलंकेचा स्टार फिरकीपटू वानिंदू हसरंगा हा वनडे क्रिकेटच्या इतिहासात सलग तीन सामन्यात पाच बळी घेणारा दुसरा गोलंदाज ठरला आहे. आयसीसी विश्वचषक २०२३ च्या पात्रता फेरीच्या सामन्यात आयर्लंडविरुद्ध हसरंगाने ही कामगिरी केली. यापूर्वी पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज वकार युनूसने ३३ वर्षांपूर्वी हा पराक्रम केला होता.
सलग तीन सामन्यांत घेतल्या ५ विकेट –
वानिंदू हसरंगा विश्वचषक पात्रता फेरीत सर्वोत्तम फॉर्ममधून जात आहे. तो या स्पर्धेतील आघाडीचा विकेट घेणारा गोलंदाज आहे. त्याने आयर्लंडविरुद्ध ७९ धावांत पाच बळी घेतले होते. याआधी हसरंगाने यूएईविरुद्ध ६/२४ आणि ओमानविरुद्ध ५/१३ अशी कामगिरी केली होती. तो सलग तीन सामन्यात ५ बळी घेणारा श्रीलंकेचा पहिला खेळाडू ठरला आहे.
हेही वाचा – MS Dhoni: महेंद्रसिंग धोनीला एअर होस्टेसने दिले खास गिफ्ट, VIDEO होतोय व्हायरल
श्रीलंकेचा १३३ धावांनी विजय –
श्रीलंकेच्या विजयाचा नायक सलामीवीर दिमुथ करुणारत्ने होता ज्याने शतक झळकावले आणि संघाला मोठ्या लक्ष्यापर्यंत पोहोचवले. याशिवाय वानिंदू हसरंगानेही ५ बळी घेत सामना विजयाच्या दिशेने नेला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या श्रीलंकेच्या संघाने ३२५ धावा केल्या होता. त्याचवेळी याला प्रत्युत्तर देताना आयर्लंडचा संघ १९२ धावांवर गारद झाला.