मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) गेल्या वर्षी कोलकाता नाइट रायडर्स संघाचा मालक आणि सिने अभिनेता शाहरुख खानवर पाच वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयावर एमसीए कायम आहे. मे महिन्याच्या ७ तारखेला कोलकाता आणि मुंबई इंडियन्स यांचा सामना होणार असून त्या वेळी शाहरुखला वानखेडेवर येता येणार नाही, अशी स्पष्ट भूमिका एमसीएने घेतली आहे.
याबाबत एमसीएचे सहसचिव नितीन दलाल यांनी सांगितले की, आम्ही मुंबई इंडियन्स संघासोबत एक करार करणार आहोत, या करारातील नियमानुसार ज्या व्यक्तीवर बंदी घातली आहे त्या व्यक्तीला संघटनेच्या परिसरात येण्याची परवानगी दिली जाणार नाही, असे म्हटले आहे.
ते पुढे म्हणाले की, शाहरुखवर बंदी घातल्यानंतर याबद्दलची माहिती आयपीएलचे अधिकारी आणि सर्व संघमालकांना आम्ही दिलेली आहे.
याविषयी सहसचिव पी. व्ही. शेट्टी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी यावर सविस्तरपणे बोलण्यास नकार दिला. पण शाहरुखवर असलेली बंदीची कारवाई कायम राहील, असे त्यांनी सांगितले.
गेल्या वर्षी कोलकाताच्या संघाचा सामना झाल्यावर शाहरुखने वानखेडेवर हैदोस घातला होता. यामध्ये सुरक्षारक्षकाला मारहाण करण्याबरोबरच त्याने एमसीएच्या अधिकाऱ्यांना शिवीगाळ केली होती. त्यामुळे विलासराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या वर्षी १८ मे रोजी झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये शाहरुखवर पाच वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
या प्रकरणानंतर या साऱ्या गोष्टींचा शाहरुखने इन्कार केला होता. स्टेडियममधील सुरक्षारक्षकांनी माझ्या मुलांसह काही मुलांना चांगली वागणूक न दिल्याचा आरोप शाहरुखने केला होता. शाहरुखने खुलासा दिल्यानंतरही एमसीएने आपली भूमिका ठाम ठेवली होती. त्यावर आयपीएलचे कमिशनर राजीव शुक्ला यांनी ‘शाहरुखबाबतचा निर्णय बीसीसीआय घेईल’ असे वक्तव्य केले होते. ते म्हणाले होते की, राज्य संघटना फक्त सुचवू शकते, पण त्यावर अंतिम निर्णय बीसीसीआय घेईल. जेव्हा बीसीसीआयपुढे हे प्रकरण येईल, तेव्हा त्यावर विचारविनिमय करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल. सध्याच्या घडीला एमसीएने सुरक्षारक्षकांना शाहरुखला संघटनेच्या परिसरात प्रवेश न देण्याचे सांगितल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.