वानखेडे स्टेडियमवर तमाम मुंबईकर क्रिकेटरसिकांच्या साक्षीने दोनशेव्या ऐतिहासिक कसोटीनिशी २४ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला अलविदा करण्याचे सचिन तेंडुलकरचे स्वप्न पूर्ण होणार आहे. याचप्रमाणे त्याच्या १९९व्या कसोटी सामन्याच्या यजमानपदाचा सन्मान कोलकाताच्या ईडन गार्डन्सला बहाल करण्यात आला आहे. वानखेडे स्टेडियमवर दोनशेवी कसोटी झाल्यास आईला हा सामना पाहता येईल, अशी विनंती सचिनने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) केली होती. त्यामुळेच वानखेडेवर शिक्कामोर्तब करण्यात आले.
राजीव शुक्ला यांच्या नेतृत्वाखालील दौरा आखणी आणि वेळापत्रक नियोजन समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीमध्ये वेस्ट इंडिजच्या भारत दौऱ्याचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला. दोन कसोटी आणि तीन एकदिवसीय सामन्यांचा समावेश असलेली सचिनच्या कारकिर्दीतील ही अखेरची मालिका असणार आहे. त्यामुळेच बीसीसीआयने आपली रोटेशन पॉलिसी (सामन्यांच्या यजमानपदाचे धोरण) बाजूला ठेवली. या धोरणानुसार, वेस्ट इंडिजविरुद्धचे दोन कसोटी सामने अनुक्रमे बंगळुरू आणि अहमदाबादला होणार होते. १४ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत वानखेडेवर पहिली कसोटी आणि ६ ते १० नोव्हेंबर या दरम्यान ईडन गार्डन्सवर दुसरी कसोटी रंगणार आहे.
याबाबत बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला म्हणाले की, ‘‘दोन्ही कसोटी सामने आमच्यासाठी महत्त्वाचे होते. त्यामुळे सामन्याचे ठिकाण भव्य असणे आवश्यक होते. स्टेडियम मोठे असावे, हा मुद्दा लक्षात घेऊन पहिल्या कसोटी सामन्याचे यजमानपद कोलकाताला देण्यात आले.’’
कॅरेबियन संघ भारत दौऱ्यावर २१, २४ आणि २७ नोव्हेंबर या दिवशी तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. पहिले दोन एकदिवसीय सामने अनुक्रमे कोची आणि विशाखापट्टणम् येथे होणार आहेत. परंतु तिसरा सामना मात्र कानपूर किंवा बडोद्याला होणार आहे.
‘‘तीन एकदिवसीय सामन्यांपैकी दोन सामन्यांची मैदाने निश्चित करण्यात आली आहेत. मात्र तांत्रिक कारणास्तव तिसऱ्या सामन्याचे स्थळ ठरवण्यात आलेले नाही. कानपूरच्या मैदानाची पाहणी झाल्यानंतरच याबाबतचा निर्णय घेण्यात येईल,’’ असे शुक्ला म्हणाले.
सचिनसारख्या महान खेळाडूला येथोचित अलविदा करण्यासाठी बीसीसीआयने खास योजना आखली आहे. त्यामुळेच नोव्हेंबर महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध मालिकेची योजना आखून घरच्या क्रिकेटरसिकांसमोर निवृत्तीसाठी सचिनला संधी दिली आहे. निवृत्तीबाबतच्या अफवांना पूर्णविराम देत गेल्या आठवडय़ात सचिनने आपल्या दोनशेव्या कसोटी सामन्यासह कसोटी क्रिकेटला अलविदा करण्याचा आपला निर्णय जाहीर केला.
विच्छा सचिनची पुरी झाली!
वानखेडे स्टेडियमवर तमाम मुंबईकर क्रिकेटरसिकांच्या साक्षीने दोनशेव्या ऐतिहासिक कसोटीनिशी २४ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला अलविदा करण्याचे सचिन तेंडुलकरचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 16-10-2013 at 04:00 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wankhede eden gardens to host sachin tendulkars last two