Wankhede Stadium 50th MCA Honoured Groundsmen: मुंबईतील सुप्रसिद्ध आणि ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमला येत्या १९ जानेवारीला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर अनेक विविध कार्यक्रमांचं नियोजन केलं आहे. दरम्यान वानखेडे स्टेडियमची, खेळपट्टीची आणि मैदानाची काळजी घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचा वानखेडेने अनोख्या पद्धतीने आणि खास सन्मान केला आहे.
प्रत्येकी पाच किलो गहू, तांदूळ आणि डाळ, मेडिकल आणि हायड्रेशन किट्स, मिक्सर ग्राइंडर, बॅग, मिनी किट बॅग, कंबरेचा पाऊच. टी बॅग आणि किटली. टॉवेल आणि नॅपकिन्स. पेन आणि नोटपॅड. बेडशीट आणि उशी. टी-शर्ट, ट्रॅक पँट, शॉर्ट्स, मोजे, शूज, फ्लिप-फ्लॉप, जॅकेट, चष्मा, टोपी आणि हॅट्स. टूथब्रश, टूथपेस्ट, साबण, केसांचे तेल, कंगवा, ब्लँकेट, छत्री, रेनकोट, भांडी, सनस्क्रीन आणि अगदी सिपर बाटल्या, अश्या सर्व परिपूर्ण गोष्टी असलेलं गिफ्ट हॅम्पर मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून या कर्मचाऱ्यांना देण्यात आलं आहे.
मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) ने प्रतिष्ठित वानखेडे स्टेडियमचा ५० वा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी आपल्या १७८ सक्रिय मैदानावरील कर्मचाऱ्यांना दिलेल्या या जंबो गिफ्ट हॅम्पर्समध्ये वरील सर्व घरगुती वस्तू आहेत. वानखेडे मैदानाची आणि स्टेडियमची काळजी घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कामाची परतफेड करणारा हा सोहळा वानखेडेच्या वर्धापन दिनाचा उत्सव साजरा करणाऱ्या कार्यक्रमांपैकी एक आहे. आठवडाभर सुरू राहणारा हा उत्सव १९ जानेवारीला एका भव्य सोहळ्याने संपन्न होईल.
द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना एमसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी या अनोख्या सत्कारामागील विचार मांडला. “आम्ही त्यांना पैसे देऊ शकलो असतो पण नेहमी पैसेच दिले जातात. आम्ही त्यांना सणांसाठी आर्थिक बोनस देतो आणि आम्ही सामने आयोजित करतो तेव्हाही पैसेच दिले जातात. यावेळी, आम्हाला काहीतरी वेगळं करायचं होतं आणि त्यांचा दिवस संस्मरणीय बनवायचा होता,” ते पुढे म्हणाले. “आम्ही त्यांना दिवसभरात वापरत असलेल्या प्रत्येक गोष्टीसह एक गिफ्ट हॅम्पर सादर करण्याचा निर्णय घेतला. ह्या फक्त मूलभूत गोष्टी आहेत. त्यांची भूमिका बहुतेक वेळा दुर्लक्षित राहते परंतु त्यांच्यातील प्रत्येक जण मैदान आणि स्टेडियमचा अविभाज्य घटक आहेत.
हेही वाचा – Wankhede Stadium : क्रिकेटची पंढरी असलेल्या मुंबईच्या वानखेडेवर भारताचा कसा आहे रेकॉर्ड? जाणून घ्या
बुधवारी वानखेडे स्टेडियमवर १९७४च्या मुंबईच्या रणजी ट्रॉफी विजेत्या संघाच्या सदस्यांचाही सन्मान करण्यात आला. जो वानखेडे स्टेडियमवर खेळणारा पहिला मुंबई संघ होता. माजी खेळाडू करसन घावरी, पद्माकर शिवलकर, अजित पै, मिलिंद रेगे आणि अब्दुल इस्माईल त्या विजेत्या संघातील खेळाडूंना प्रत्येकी १० लाख रुपये देण्यात आले.
अजिंक्य नाईक याबाबत म्हणाले की, एमसीएला वाटले की या उत्सवाबरोबरच वानखेडे स्टेडियमच्या इतिहासाची जगाला जाणीव करून देण्याचीही ही एक संधी आहे. “या वर्धापन दिनात प्रत्येकाने भाग घ्यावा अशी आमची इच्छा आहे, प्रत्येकानेच महत्त्वाची भूमिका बजावली आहे आणि या इतिहासाची नोंद ठेवणं गरजेचं असल्याचंही आम्हाला वाटलं. म्हणूनच आम्ही १९ जानेवारी रोजी एका भव्य कार्यक्रमाची योजना आखली आहे, जिथे भारताच्या कर्णधारांचा सत्कार केला जाईल,” नाईक पुढे म्हणाले.
१९ जानेवारीच्या कार्यक्रमात मुंबईतील सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, दिलीप वेंगसरकर, रवी शास्त्री, अजिंक्य रहाणे, सूर्यकुमार यादव आणि डायना एडुलजी यांसारखे भारतीय क्रिकेट स्टार उपस्थित राहतील. एक कॉफी टेबल बुक आणि स्मरणार्थ पोस्टल स्टॅम्प देखील प्रकाशित केले जाईल.
वानखेडे स्टेडियम १९७४ मध्ये बांधण्यात आले, जेव्हा मुंबई क्रिकेट संस्थेला स्वतःच्या क्रिकेट मैदानाची गरज भासली. त्याआधी मुंबईतील क्रिकेट सामने हे ब्रेबॉर्न स्टेडियम खेळवले जायचे.१९४८ मध्ये भारताच्या पहिल्या सामन्याचे यजमानपद ब्रेबॉर्न क्रिकेट स्टेडियमच होते.