भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात मुंबईत होणारा चौथा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना वानखेडे स्टेडियमवरून ब्रेबॉर्न स्टेडियमवर हलवण्यात आला आहे, अशी माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) दिली आहे.

‘‘सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या प्रशासकीय समितीच्या निर्देशानुसार मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) यजमानपदाखाली वानखेडे स्टेडियमवर २९ ऑक्टोबरला होणारा एकदिवसीय सामना आता क्रिकेट क्लब ऑफ इंडियाला स्थलांतरित करण्यात आला आहे,’’ असे ‘बीसीसीआय’ने स्पष्ट केले आहे.

कार्यकारिणी समिती व प्रशासकीय समिती दोन्हीही अस्तित्वात नसल्यामुळे कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या कोणी करायच्या, या अडचणीचा सामना सध्या मुंबई क्रिकेट असोसिएशन करीत आहे. या सामन्याच्या दृष्टीने निविदासुद्धा त्यांना काढता येत नव्हत्या. आर्थिक कोंडीचा सामना करणाऱ्या ‘एमसीए’ने सामन्याच्या यजमानपदाबाबत असमर्थता दर्शवली होती.