मुंबई : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात वापरण्यात आलेली खेळपट्टी बरीच चर्चेचा विषय ठरली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेलाही (आयसीसी) यावर स्पष्टीकरण द्यावे लागले. विशेष खेळपट्टी सल्लागारांना विश्वासात घेऊन हे पाऊल उचलण्यात आले असल्याचे स्पष्टीकरण ‘आयसीसी’ने दिले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या उपांत्य सामन्याच्या काही तासांआधी भारतीय संघ व्यवस्थापनाने फिरकीला अनुकूल अशा खेळपट्टीची मागणी केल्याची माहिती समोर आली होती. मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या उपांत्य सामन्यासाठी नवीन खेळपट्टी तयार करण्याची योजना होती, पण फिरकीपटूंना मदत मिळावी म्हणून हा सामना आधी वापरण्यात आलेल्या खेळपट्टीवर खेळवण्यात आला.

हेही वाचा >>> Ind vs New: भारतीय संघ अंतिम फेरीत; धावांच्या मैफलीत ‘सुपर सेव्हन’सह मोहम्मद शमी किमयागार

‘‘दीर्घकाळ सुरू राहणाऱ्या स्पर्धेच्या अखेरीस खेळपट्टीमध्ये बदल करण्याची प्रक्रिया ही सामान्य आहे. हा बदल आम्ही त्या केंद्रावरील खेळपट्टी देखरेखकार (क्यूरेटर) यांच्या शिफारसीवर केला आहे. ‘आयसीसी’चे स्वतंत्र खेळपट्टी सल्लागार अँडी अ‍ॅटकिन्सन यांना या बदलाबाबत कल्पना देण्यात आली होती,’’ असे ‘आयसीसी’ने आपल्या निवेदनात म्हटले आहे. ‘आयसीसी’च्या नियमानुसार यजमान संघ ‘खेळपट्टीची निवड आणि तयारीसाठी जबाबदार आहे’ आणि बाद फेरीचे सामने नवीन खेळपट्टीवर खेळणे गरजेचे नाही. ज्या ठिकाणी सामन्याचे आयोजन होणार आहे, त्या सामन्याकरता सर्वोत्तम खेळपट्टी व मैदान तयार करणे हा एकमेव निकष आहे. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सला कोलकातामध्ये याबाबत विचारण्यात आले, तेव्हा त्याने या गोष्टीला फार महत्त्व दिले नाही. ‘‘मी तो अहवाल बघितला आहे. ‘आयसीसी’कडे स्वतंत्र खेळपट्टी देखरेखकार आहे. त्यामुळे ते दोन्ही संघांसाठी खेळपट्टी समतोल राहील, हे सुनिश्चित करत असतील. या स्पर्धेत आतापर्यंत आम्हाला खेळपट्टीबाबत कोणतीही अडचण आली नाही,’’ असे कमिन्स दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या उपांत्य सामन्यापूर्वी म्हणाला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wankhede stadium pitch row icc issues clarification on wankhede pitch controversy zws