काही दिवसांपूर्वी नवी दिल्लीत झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत बॉक्सर मेरी कोमने ४८ किलो वजनी गटात विजेतेपद मिळवलं. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतलं मेरीचं हे सहावं विजेतेपद ठरलं. या कामगिरीनंतर सर्वच स्तरातून मेरीवर कौतुकाचा वर्षाव होत होता. मात्र या विजयानंतरही मेरीची पदकाची भूक अजुन काही शमलेली दिसत नाहीये. आगामी २०२० ऑलिम्पिकसह जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचं सातवं विजेतेपदं पटकावण्याची तयारी मेरी कोम करत आहे.
“मी पुन्हा विजेती व्हावं हे माझं स्वप्न आहे. त्यासाठी मी मेहनतही घेते आहे. मी ३ मुलांची आई आहे, त्यामुळे साहजिकच माझ्या काही अन्य जबाबदाऱ्याही मला पार पाडायच्या आहेत. याचसोबत राज्यसभेचं खासदारपद मिळाल्यामुळे सामान्य लोकांच्याही आता माझ्याकडून काही अपेक्षा असतील, मात्र या सर्व गोष्टींचा माझ्या सरावात व्यत्यय येणार नाही. ऑलिम्पिक सुवर्णपदकासह जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचं सातवं विजेतेपद मला मिळवायचं आहे.” एका कार्यक्रमात मेरी कोम बोलत होती. याचसोबत आगामी १-२ वर्ष आपण बॉक्सिंग खेळत राहणार असल्याचंही मेरी कोम म्हणाली.