‘‘आजपर्यंत मी भारताला अनेक स्पर्धामध्ये विजेतेपद मिळवून दिले आहे. मात्र विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद मला खुणावत आहे आणि ते लक्ष्य मी निश्चित साध्य करीन,’’ असा आत्मविश्वास भारतीय हॉकी संघाचा कर्णधार सरदारा सिंग याने व्यक्त केला. सरदारा सिंग हा सध्या हॉकी इंडिया लीगमध्ये दिल्ली वेव्हरायडर्सचेही नेतृत्व करीत आहे. त्याने आजपर्यंत अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे तसेच कर्णधारपदाची धुराही सांभाळली आहे. हॉकी लीग व आगामी स्पर्धाविषयी त्याने आपले मनोगत प्रकट केले.
*कारकिर्दीतील मुख्य ध्येय कोणते आहे?
अर्थातच आगामी विश्वचषक स्पर्धेत भारताला अजिंक्यपद मिळवून देण्याचे. या स्पर्धेची पात्रता आम्ही यापूर्वीच पूर्ण केली आहे. विश्वचषक जिंकणे ही सोपी गोष्ट नसली तरी ते यश मिळविण्याची क्षमता आमच्या खेळाडूंमध्ये निश्चित आहे. त्या क्षमतेइतकी शंभर टक्के कामगिरी करण्याचेच आमचे प्रयत्न राहतील. ऑलिम्पिक स्पर्धेला अद्याप दोन वर्षे बाकी आहेत. सध्या तरी त्याचा मी विचार करीत नाही. यंदा आशियाई क्रीडा स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धा आमच्यासाठी ऑलिम्पिकची पूर्वतयारी असणार आहे. आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक मिळविण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.
*अनेक वेळा आघाडी असताना भारत सामना गमावतो, त्याबाबत काय सांगता येईल?
हार-जीत हा खेळाचाच एक भाग असतो. आमचे खेळाडू काही वेळा विनाकारण दडपणाखाली खेळतात. त्यामुळे सामना जिंकणार अशी स्थिती असताना आम्ही सामने गमावले आहेत. हे दडपण दूर करण्यावर आम्ही सध्या भर देत आहोत. बचावात्मक खेळात आम्हाला बरेच काही करावे लागणार आहे. ही बाजू बळकट करण्यासाठी सराव शिबिरात प्राधान्य दिले जाणार आहे.
*पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करण्याबाबत आपण कमी पडतो, असे तुला वाटते का?
पेनल्टी कॉर्नर ही हुकमी संधी आहे, याबाबत तीळमात्र शंका नाही. मात्र अन्य संघांचे खेळाडू अशा संधीवरील फटके अडविण्याबाबत अव्वल कामगिरी करू लागले आहेत. पेनल्टी कॉर्नरद्वारा गोल करण्याच्या कौशल्यात आम्हाला थोडीशी सुधारणा करावी लागणार आहे. आमची शंभर टक्के कामगिरी कशी होईल, असा आमचा प्रयत्न राहील.
*हॉकी लीग स्पर्धेतील अनुभवाचा फायदा आपल्या खेळाडूंना कितपत मिळणार आहे?
सध्या सुरू असलेल्या लीगमध्ये अनेक परदेशी खेळाडू सहभागी झाले आहेत. त्यांच्याबरोबर खेळण्याचा अनुभव हा आमच्यासाठी भावी कारकिर्दीसाठी शिदोरीच असणार आहे. परदेशी खेळाडूंच्या तंत्राशी परिचित होण्याची हुकमी संधी या स्पर्धेद्वारे मिळते, तसेच परदेशी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही विविध फ्रँचाईजीकडून खेळत असल्यामुळे त्यांच्याकडूनही अनेक उपयुक्त सूचना मिळतात. त्याचाही फायदा आम्हांला मिळतो. दिल्ली संघाकडून खेळताना मला खेळाचा खरा आनंद मिळत आहे. आमचा संघ अतिशय समतोल आहे.
*भारतीय संघाला ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक टेरी वॉल्श यांचे मार्गदर्शन मिळत आहे. त्याबाबत काय सांगता येईल?
वॉल्श हे खूप अनुभवी खेळाडू आहेत. त्यांना ऑलिम्पिक व विश्वचषक स्पर्धाचा चांगला अनुभव आहे. त्यांच्याकडून आम्हाला सतत चांगल्या सूचना मिळतात. खेळाडूंबरोबर त्यांचा चांगला सुसंवाद आहे. ते आमच्यासाठी खूप मेहनत घेत असतात. हॉकीत अव्वल यश मिळविण्यासाठी नेमके काय करायला पाहिजे हे त्यांच्याकडून आम्हास शिकविले जात आहे. संघातील कच्चे दुवे दूर करण्यावर ते भर देत आहेत.
*हॉकीच्या प्रगतीसाठी काय करायला पाहिजे?
हा खेळ तळागाळापर्यंत पोहोचण्याची आवश्यकता आहे. क्रिकेटसारखीच प्रसिद्धी या खेळाला मिळायला पाहिजे. सुदैवाने आता आमच्या खेळास चांगले प्रायोजक मिळू लागले आहेत. जर आमच्या खेळाला भरपूर प्रसिद्धी मिळाली तर निश्चित अधिकाधिक प्रायोजक आमच्याकडे येतील. तो सुदिन लवकरच येईल अशी मला खात्री आहे.

Story img Loader