शेन वॉर्न, मॅथ्यू हेडन, जेसन गिलेस्पी यांच्यासारख्या अनुभवी खेळाडूंनी निवृत्तीची घाई केली. त्यांनी आणखी थोडा काळ संघास दिला असता तर संघात जुन्या व नवीन पिढीतील खेळाडू यांचा चांगला समन्वय झाला असता असे ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज शॉन टेट याने सांगितले.
गिलेस्पी, वॉर्न, हेडन, मायकेल कॅस्प्रोविझ यांच्यासारख्या खेळाडूंकडून युवा पिढीतील खेळाडूंना बरेच काही शिकण्याजोगे होते. हे अनुभवी खेळाडू आणखी थोडा काळ संघात राहिले असते तर आता जी जुन्या व नवीन पिढीतील खेळाडूंमध्ये दर्जाची दरी दिसते तशी दरी पाहावयास मिळाली नसती असे सांगून टेट म्हणाला, ऑस्ट्रेलियन संघात तसेच स्थानिक स्पर्धामधील पद्धतीत काही बदल होणार आहे असे मी ऐकले आहे. स्थानिक क्लबमध्ये जेव्हा युवा खेळाडूंना अनुभवी खेळाडूंसमवेत खेळण्याची संधी मिळते, तेव्हा या युवा खेळाडूंनी अनुभवी खेळाडूंकडून भावी कारकिर्दीसाठी शिकवणीची शिदोरी घेतली पाहिजे. श्रीलंकेचे खेळाडू आयपीएलवर बहिष्कार घालण्याची शक्यता आहे, तसे झाल्यास स्पर्धेचा आंतरराष्ट्रीय दर्जा खालावला जाणार आहे काय असे विचारले असता टेट म्हणाला, खेळाडूंना निर्णय घेण्याचा अधिकार नाही यासारखे दुर्दैव नाही. एक-दोन देशांच्या खेळाडूंनी भाग घेतला नाही तरी स्पर्धेचा आंतरराष्ट्रीय दर्जा कमी होणार नाही. ही स्पर्धा भारतात होत असली तरी अतिशय चांगल्या दर्जाची ही स्पर्धा आहे.

Story img Loader