वेस्ट इंडिजच्या मर्लान सॅम्युअल्स याला शिवीगाळ केल्याबद्दल ऑस्ट्रेलियाचा ज्येष्ठ फिरकी गोलंदाज शेन वॉर्न याच्यावर एक सामन्यासाठी बंदी तसेच ४५०० ऑस्ट्रेलियन डॉलर्स दंड ठोठावण्यात आला आहे.  बिग बाश स्पर्धेत वॉर्न हा मेलबर्न स्टार्स संघाचे नेतृत्व करीत आहे तर सॅम्युअल्स हा रेनेगेड्स संघाकडून खेळत आहे. डेव्हिड हसीच्या गोलंदाजीवर सॅम्युअल्सने फटका मारला व धाव घेतली. तो दुसरी धाव काढून परत येत असताना वॉर्न याने त्याच्या दिशेने अपशब्द उच्चारला. पुढच्या षटकांत वॉर्नने चेंडू सॅम्युअल्सच्या छातीच्या दिशेने फेकला. हा चेंडू सॅम्युअल्सच्या छातीवर आदळला. सॅम्युअल्स हा बॅट घेत वॉर्नच्या दिशेने धावला. पंचांनी मध्यस्थी करीत दोन्ही खेळाडूंना शांत केले. त्यानंतर लसित मलिंगाच्या चेंडूवर डोळ्याच्या जवळ दुखापत झाल्यामुळे सॅम्युअल्सला तंबूत परतावे लागले.
ऑस्ट्रेलियन क्रिकेट मंडळाने वॉर्न व सॅम्युअल्स यांच्यावर बेशिस्त वर्तन केल्याबद्दल कारवाई करण्याचा निर्णय घेतला. सॅम्युअल्सवरील कारवाई तो दुखापतीमधून तंदुरुस्त झाल्यानंतर त्याची चौकशी झाल्यावर केली जाणार आहे.
दरम्यान वॉर्न याची चौकशी करण्यात आली व त्याला या स्पर्धेतील एका सामन्यात खेळण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याखेरीज मोठय़ा आर्थिक दंडाची शिक्षाही त्याला करण्यात आली आहे. वॉर्न याने आपल्या गुन्ह्य़ाची कबुली देत सांगितले, मी जरा जास्तच बेशिस्त वर्तन केले आहे. मी माझ्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकलो नाही. मला दिलेली शिक्षा मला मान्य आहे. खेळात काही वेळा तुम्ही स्वत:च्या भावना रोखू शकत नाही. माझ्याकडून तसेच काहीसे झाले असावे. मी असे कृत्य करायला नको होते. एका सामन्यात मी खेळू शकणार नाही. माझ्या अनुपस्थितीत माझे सहकारी चांगली कामगिरी करीत उपांत्य फेरीत स्थान मिळवतील अशी मला खात्री आहे.