चेंडू कुरतडण्याच्या प्रकरणी सध्या ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नर याच्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्या कृतीमुळे त्याला अनेक हालअपेष्टा भोगाव्या लागत आहेत. मात्र हे दुःख कमी की काय म्हणून त्याच्या वैयक्तिक आयुष्यातही दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
डेव्हिड वॉर्नरने चेंडू कुरतडल्या प्रकरणी दिलेल्या कबुलीनंतर आठवडाभरातच माझा गर्भपात झाला, अशी धक्कादायक बाब वॉर्नरची पत्नी कँडिस वॉर्नर हिने उघड केली आहे. एका मुलाखतीदरम्यान तिने हे सांगितले.
मार्च महिन्यात वॉर्नरची पत्रकार परिषद झाली. त्यात त्याने स्टीव्ह स्मिथ याच्यासोबत आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर लगेच एकच आठवड्यानंतर आम्ही आमचे बाळ गमावले. अतिरिक्त तणावामुळे माझा गर्भपात झाला, असे कँडिस म्हणाली.
याबाबत अधिक माहिती देताना ती म्हणाली की मी बाथरूममध्ये असताना रक्तस्त्राव होत असल्याचे माझ्या लक्षात आले. त्यानंतर मी वॉर्नरला बोलावले आणि ही गोष्ट सांगितली. त्यावेळीच आम्हाला आमचं बाळ जिवंत नसल्याचं समजलं. त्या गोष्टीमुळे आम्हाला प्रचंड त्रास झाला आणि आम्ही दोघेही ढसाढसा रडलो. या घटनेने आम्ही कोलमडून गेलो होतो. आधीच चेंडू कुरडतण्याच्या प्रकरणावरून आम्ही मनस्ताप सहन करत होतो. तशातच या घटनेमुळे आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला.
आम्हाला कुटुंबात तिसरं अपत्य हवं होतं. केपटाऊनमध्ये असतानाच मी गरोदर असल्याचे आम्हाला समजले होते. आम्ही आनंदात होतो. पण त्यानंतर आमच्या आयुष्यात दुःख आले. या दुःखाने अजिबात खचून जायचे नाही आणि याचा आयुष्यातील गोष्टींवर परिणामही होऊ द्यायचा नाही, असे आम्ही दोघांनी ठरवले, असेही तिने स्पष्ट केले.
डेव्हिड आणि कँडिस यांना आयव्ही माय (३) आणि इंडी राय (२) अशा दोन मुली आहेत.