David Warner vs Mitchell Johnson: पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघाची निवड करण्यात आली आहे. डेव्हिड वॉर्नरच्या निवडीबाबत सातत्याने वाद होत आहेत. त्याला संघात ठेवण्याच्या निर्णयावर माजी वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सन नाराज आहे. त्याने या सलामीवीर फलंदाजाविरोधात वक्तव्य करत बॉल टेम्परिंगचा मुद्दा पुन्हा उपस्थित केला. आता त्यावर ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधून वेगवगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जॉन्सनने वॉर्नरवर टीका करताना म्हटले की, “तो इतका मोठा खेळाडू नाही की त्याचा निरोप समारंभ करावा. बॉल टेम्परिंग प्रकरणात ज्याने गुन्हा केला होता अशा गुन्हेगाराला तुम्ही अजिबात हिरो बनवू नये. त्याला निरोपाची मालिका खेळवण्याची गरज नव्हती.” आता जॉन्सनच्या वक्तव्यावर ऑस्ट्रेलियन क्रिकेट निवड समिती आणि डावखुरा फलंदाज उस्मान ख्वाजाची प्रतिक्रिया समोर आली आहे.

कसोटीतील खराब फॉर्म असूनही वॉर्नरची निवड केल्याबद्दल जॉन्सनने ऑस्ट्रेलियाचे मुख्य निवडकर्ता जॉर्ज बेली यांच्यावर टीका केली आहे. तो म्हणाला, “जेव्हा टीम पेनची कारकीर्द वादानंतर संपुष्टात येत होती, तेव्हा निवड समितीचे अध्यक्ष जॉर्ज बेली यांनी सांगितले होते की, पेनचे भवितव्य ठरवायचा अधिकार त्यांना नाही कारण, ते  दोघेही चांगले मित्र होते. जॉर्ज बेलीच्या नेतृत्वाखाली वॉर्नरने अलिकडच्या काही वर्षांत चांगली कामगिरी केली होती. त्याला ऑस्ट्रेलियन क्रिकेटचा पदभार स्वीकारायचा प्रस्ताव देखील दिला होता. तो बेलीबरोबर तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळला आहे. त्यामुळे हे प्रश्न निर्माण होत आहेत.”

हेही वाचा: कोहली आणि धोनी दक्षिण आफ्रिका लीगमध्ये खेळतील का? डिव्हिलियर्सने दिले मजेशीर उत्तर; म्हणाला, “त्यांच्या कारकिर्दीला…”

जॉर्ज बेली यांनी जॉन्सनला उत्तर दिले

जेव्हा बेलीला माजी वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सनच्या वक्तव्यावर प्रश्न विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला की, “मला आशा आहे की जॉन्सन सध्या आनंदित असेल आणि त्याच्या घरी सर्वकाही व्यवस्थित सुरु असेल.” बेली पुढे म्हणाला, “मला त्याचे वक्तव्य हे तुकड्या तुकड्यात पाठवण्यात आले आहेत. मला आशा आहे की तो ठीक आहे. नक्की तो काय म्हणाला, याची मला काहीच कल्पना नाही. मात्र, माझे एकमात्र निरीक्षण असे आहे की, कोणाची पात्रता किती आहे हे चाहते ठरवत असतात.” पुढे बेली म्हणाले की, “कोणीतरी मला सांगू शकेल की खेळाडू कोणत्या मानसिकतेतून जात आहेत? संघ काय योजना आखत आहेत? कोचिंग स्टाफच्या डोक्यात काय सुरु आहे? कोणत्या खेळाडूला संघात घेतल्यास ते अधिक फायदेशीर ठरेल? या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळाल्यास मी सर्वकाही जॉन्सनचे ऐकून घेईन.”

जर वॉर्नरच्या कसोटीतील विक्रमाबद्दल सांगायचे तर, त्याने ऑस्ट्रेलियासाठी १०९ कसोटी सामन्यांमध्ये ४४.३३च्या सरासरीने ८४८७ धावा केल्या आहेत. त्याने कसोटीत २५ शतके आणि ३६ अर्धशतके केली आहेत. मात्र, २०२० पासून, वॉर्नरची कसोटी सरासरी केवळ ३१.७९ वर घसरली आहे. तरीही बेलीला वाटते की, तो दीर्घ स्वरूपातील ऑस्ट्रेलियाचा सर्वोत्तम खेळाडू आहे.

हेही वाचा: IND vs AUS: दिग्गज माजी फिरकीपटूने रवी बिश्नोईबाबत केले मोठे विधान; म्हणाला, “कुंबळे आणि अश्विनपेक्षा…”

स्मिथ आणि वॉर्नरला ख्वाजाची साथ लाभली

वॉर्नरवर केलेल्या टीकेला उस्मान ख्वाजाने उत्तर दिले आहे. तो म्हणाला, “वॉर्नर आणि स्मिथ माझ्या दृष्टीने हिरो आहेत. वाईट काळामुळे ते वर्षभर क्रिकेट खेळले नाहीत. जगात कुणीही परिपूर्ण नाही. मिचेल जॉन्सनही नाही. डेव्हिड वॉर्नर किंवा सॅंडपेपर घोटाळ्यात सामील असलेला कोणताही खेळाडू हिरो नाही असे जर कोणी म्हणत असेल तर मी त्याच्याशी सहमत नाही कारण त्यांनी त्यांची शिक्षा भोगली आहे. एक वर्ष हा खूप मोठा काळ असतो.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Warner is not a hero usman khawaja took a dig at mitchell johnsons statement know what he said avw