Washington Sundar 7 wickets IND vs NZ: ‘कानामागून आला आणि तिखट झाला…’ ही म्हण वॉशिंग्टन सुंदरच्या आजच्या खेळीला अगदी साजेशी आहे. बीसीसीआयने दुसऱ्या, तिसऱ्या कसोटीसाठी वॉशिंग्टन सुंदरला संघात सामील केले. यानंतर पुणे कसोटीत वॉशिंग्टन सुंदरला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी देत अचूक बदल केला. वॉशिंग्टन सुंदरनेही पहिल्याच डावात या मिळालेल्या संधीचं सोनं केलं आणि पाच विकेट्स घेत भेदक गोलंदाजी केली. सुंदरने न्यूझीलंड संघाला सर्वबाद करण्यात मोठी भूमिका नोंदवली. वॉशिंग्टन सुंदरने पहिला पाच विकेट हॉल घेत त्याने एका डावात ७ विकेट्स घेतल्या आहेत. सुंदरने २३.१ षटकांत ५९ धावा देत ७ विकेट्स घेतले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१८ ते २१ ऑक्टोबर या कालावधीत फिरोझशहा कोटला, दिल्ली इथे तामिळनाडू आणि दिल्ली यांच्यात रणजी करंडकाचा सामना झाला होता. या लढतीत तामिळनाडूने प्रथम फलंदाजी करताना वॉशिंग्टन सुंदरने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येत १९ चौकार आणि एका षटकारासह १५२ धावांची मॅरेथॉन खेळी केली होती. या खेळीनंतर बोलताना मी स्वत:ला मधल्या फळीतील फलंदाज असल्याचं सुंदरने पत्रकारांशी बोलताना सांगितल होतं. गोलंदाजीतही सुंदरने ६ विकेट्स घेत चमक दाखवली. याचवेळी बंगळुरू कसोटी सुरू होती. या अष्टपैलू कामगिरीची दखल घेत सुंदरला न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी संघात समाविष्ट करण्यात आलं. निवडसमिती आणि संघव्यवस्थापनाचा विश्वास सार्थ ठरवत सुंदरने कारकीर्दीतल्या पहिल्यांदा डावात पाच विकेट्स घेण्याची करामत केली.

हेही वाचा – IND vs NZ: रविचंद्रन अश्विनचा WTC इतिहासात मोठा पराक्रम, नॅथन लायनचा रेकॉर्ड मोडत ठरला नंबर वन गोलंदाज

वॉशिंग्टन सुंदरला २०२१ मधील कसोटी सामन्यानंतर थेट पुणे कसोटीत खेळण्याची संधी मिळाली. १३२९ दिवसांच्या प्रतिक्षेनंतर सुंदरला पुन्हा कसोटी संघात सामील केलं आणि त्याने चमत्कारच केला. मार्च महिन्यात इंग्लंड संघाच्या भारत दौऱ्यात वॉशिंग्टन सुंदरने २०२१ मध्ये शेवटचा कसोटी सामना खेळला होता. या सामन्यात संघासाठी डोकेदुखी ठरलेल्या रचिन रवींद्रला क्लीन बोल्ड करत त्याने पहिलीच कमाल विकेट मिळवली. सुरूवातीपासूनच वॉशिंग्टनने भेदक गोलंदाजी करत फलंदाजांना जेरीस आणलं होतं अन् अखेरीस त्या सातत्याचा फायदा करून घेत त्याने ऐतिहासिक स्पेल टाकली.

हेही वाचा – Highest T20I Total: झिम्बाब्वेचा टी-२० मध्ये विश्वविक्रम! १२० चेंडूत ३४४ धावा, ३० चौकार आणि २७ षटकार; धावांचा महापूर

वॉशिंग्टन सुंदरची जबरदस्त स्पेल

रचिन रवींद्र – क्लीन बोल्ड
डॅरिल मिचेल – पायचीत
टॉम ब्लंडल – क्लीन बोल्ड
ग्लेन फिलिप्स – अश्विनकडून झेलबाद
मिचेल सँटनर – क्लीन बोल्ड
टीम साऊदी – क्लीन बोल्ड
एजाज पटेल – क्लीन बोल्ड

वॉशिंग्टन सुंदरच्या ७ विकेट्स आणि रवीचंद्रन अश्विनच्या ३ विकेट्सच्या जोरावर भारताने न्यूझीलंड संघाला २५९ धावांवर पहिल्याच दिवशी सर्वबाद केलं आहे. किवी संघाकडून डेव्हॉन कॉन्वेने ७६ धावा, रचिन रवींद्र ६५ धावा आणि मिचेल सँटनर ३३ धावा यांच्या जोरावर न्यूझीलंडने २५९ धावांचा टप्पा गाठला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Washington sundar 6 wickets in test take first five wicket haul in ind vs nz with the best spell bdg