Washington Sundar clean bowled Rachin Ravindra 2nd time : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात किवी संघाने पहिल्या डावात सर्वबाद २५९ धावा केल्या होत्या, प्रत्युत्तरात पुन्हा एकदा भारतीय फलंदाजांची दाणादाण उडाली आणि संपूर्ण संघ १५६ धावांवर गारद झाला. ज्यामुळे न्यूझीलंडने १०३ धावांच्या आघाडीसह आपल्या दुसऱ्या डावाला सुरुवात केली, मात्र पुन्हा एकदा वॉशिंग्टन सुंदर त्यांच्यासाठी कर्दनकाळ ठरत आहे. त्याने सलग दुसऱ्या डावात रचिन रवींद्रला त्रिफळाचीत करत तिसरा धक्का दिला, ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
विशेष म्हणजे भारताचा फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदरने सलग दुसऱ्या रचिन रवींद्रचा त्रिफळा उडवला. याआधी पहिल्या डावातही सुंदरने रचिन रवींद्र ६५ धावांवर बाद केले होते. त्यानंतर आता दुसऱ्या डावातील २२ व्या षटकातील पाचव्या चेंडूवर सुंदरने ८९ धावांवर न्यूझीलंडला रचिन रवींद्रच्या रुपाने तिसरा धक्का दिला. तो ९ धावांवर करुन तंबूत परतला. अशा प्रकारे वॉशिंग्टन सुंदरच्या फिरकीसमोर सलग दुसऱ्या डावात रचिन रवींद्र हतबल दिसला. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
भारताचा पहिला डाव १५६ धावांवरच आटोपला –
भारताचा पहिला डाव १५६ धावांवर आटोपला. भारतीय संघ केवळ ४५.३ षटकेच खेळू शकला. रोहित शर्मा गुरुवारीच खाते न उघडताच बाद झाला. शुक्रवारी भारताला पहिला झटका शुबमन गिलच्या रूपाने बसला. तो ३० धावा करून बाद झाला. त्याचवेळी विराट कोहलीही काही विशेष करू शकला नाही आणि एक धाव काढून पॅव्हेलियन परतला. ऋषभ पंत (१८), सर्फराझ खान (११) आर अश्विन (४), आकाश दीप (६) आणि बुमराह खाते न उघडता बाद झाला. रवींद्र जडेजाने सर्वाधिक ३८ धावा केल्या आणि वॉशिंग्टन सुंदर १८ धावा केल्यानंतर नाबाद राहिला. ज्यामुळे पहिल्या डावात २५९ केल्यांनतर १०३ धावांची आघाडी घेतली.