भारताचा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदरने पहिल्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडकडून झालेल्या पराभवाला, तो फक्त एक सामना असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर तो म्हणाला की संघ तीन सामन्यांच्या मालिकेत जबरदस्त पुनरागमन करेल. न्यूझीलंडने भारतासमोर १७७ धावांचे लक्ष्य ठेवले होते. पंरतु प्रत्युत्तरात भारतीय संघ केवळ ९ बाद १५५ धावा करु शकला. त्यामुळे भारतीय संघाला २१ धावांनी पराभवला सामोरे जावे लागले.
या सामन्यात भारतीय संघाकडून वॉशिंग्टन सुंदरने सर्वाधिक धावांचे योगदान दिले. त्याने २८ चेंडूत भारतीय संघासाठी ५० धावांचे योगदान दिले. दरम्यान त्याला भारतीय संघाला विजयाच्या पार पोहोचवता आले नाही. त्यामुळे न्यूझीलंड संघाने तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
सामन्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना वॉशिंग्टन म्हणाला, “मला विश्वास आहे की, ते फक्त एका सामन्यापुरते मर्यादित आहे. फिरकीपटूंना मदत करणाऱ्या खेळपट्टीमुळे किंवा आम्हाला कोणत्याही विभागात सुधारणा करण्याची गरज आहे का, यावरही माझा विश्वास नाही. हा फक्त एका सामन्याचा मुद्दा आहे. जर आम्हाला वेगवान किंवा चांगली सुरुवात मिळाली असती तर गोष्टी वेगळ्या प्रकारे घडू शकल्या असत्या. खेळपट्टी निश्चितपणे फिरकी घेत होती आणि तुम्हाला अनेकदा अशा विकेट्स पाहायला मिळतात.”
वॉशिंग्टन पुढे म्हणाला, “आमच्या संघाचे खेळाडू आयपीएलमध्ये आणि भारतीय संघासाठीही अशा प्रकारच्या विकेट्सवर खेळत आहेत. त्यामुळे ते एका सामन्यापुरते मर्यादित होते, ज्यात काही गोष्टी आमच्या मनाप्रमाणे झाल्या नाहीत.”
जेव्हा वॉशिंग्टनला विचारण्यात आले की भारतीय शीर्ष फळीमध्ये बदलाची गरज आहे का, तेव्हा तो म्हणाला, “तुम्हाला खरोखर बदलाची गरज आहे असे वाटते का? तुम्हाला तुमची आवडती बिर्याणी रेस्टॉरंटमध्ये मिळत नसेल, तर तुम्ही पुन्हा त्या रेस्टॉरंटमध्ये जाणार नाही का?’
वॉशिंग्टन म्हणाला, “याचा अर्थ असा नाही की आपण आपली सर्वोच्च क्रमवारी बदलली पाहिजे. हा खेळ आहे आणि असे कोणासोबतही होऊ शकते. त्यामुळे धीर धरावा लागेल. खेळाच्या शेवटी, दोन्ही संघ जिंकू शकत नाहीत किंवा सर्व २२ खेळाडू चांगली कामगिरी करू शकत नाहीत. या सर्वांनी कधी ना कधी चांगली कामगिरी केली आहे.”