Washington Sundar credits to Ravichandran Ashwin : भारताचा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदरने न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी आपल्या अप्रतिम गोलंदाजीने सर्वांना आश्चर्यचकित केले. पुण्यातील कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी या युवा स्टारने पाहुण्या संघाला पहिल्या डावात ७ विकेट्स घेत २५९ धावांवर रोखण्यात सर्वात मोठे योगदान दिले. सुंदरने तीन वर्षांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आणि चमकदार कामगिरी केली. या अप्रतिम गोलंदाजीनंतर त्याने कोणाच्या मदतीने हा मोठा पराक्रम करण्यात यश मिळवले, याबाबत खुलासा केला.
दुसऱ्या कसोटीसाठी सुंदरने कुलदीप यादवच्या जागी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवले आणि रोहित शर्माने घेतलेला हा मोठा निर्णय योग्य असल्याचे सिद्ध केले. संघात तीन बदल करण्यात आले, त्यापैकी एक वॉशिंग्टन सुंदर होता. सुंदरने केवळ शानदार कामगिरी केली नाही तर त्याने पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर अनुभवी ऑफस्पिनर अश्विनकडून शिकत आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केल्याचा खुलासाही केला.
कामगिरीत सातत्य राखणे महत्वाचे आहे –
वॉशिंग्टनने गुरुवारी न्यूझीलंडविरुद्ध ५९ धावांत सात विकेट्स घेत रोहित शर्माचा निर्णय योग्य सिद्ध केला. मार्च २०२१ नंतरची ही त्याची पहिली कसोटी आहे. देशांतर्गत स्तरावर कसोटी सामने खेळण्याच्या महत्त्वाबाबत बोलताना तामिळनाडूच्या या खेळाडूने दिवसाच्या खेळानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत प्रसारमाध्यमांना सांगितले की, ‘माझ्यासाठी तामिळनाडू-दिल्ली सामना खेळण्याची मोठी संधी होती. कारण माझ्यासाठी मोठ्या फॉरमॅटचे सामने खेळणे आणि बॅट-बॉलने लय राखणे योग्य ठरले. तसेच, कामगिरीत सातत्य राखणे महत्वाचे आहे.”
हेही वाचा – Rohit Sharma : रोहित शर्माने मोडला कपिला देव यांचा नकोसा विक्रम, टिम साऊदीसमोर पुन्हा दिसला हतबल
रणजीमध्ये अधिक षटके टाकणे फायदेशीर ठरले
या २५ वर्षीय खेळाडूने सांगितले. सुंदर म्हणाला, ‘त्या सामन्यात मला बरीच षटके टाकण्याची संधी मिळाली याचाही फायदा झाला. त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. त्यामुळे मी आजचा दिवस कधीच विसरु शकणार नाही. कारण हा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे. चेडू खूपच मऊ झाला होता. त्यामुळे चेंडूला अधिक गती द्यावी लागत होती. मी आणि अॅश भाई एकमेकांशी सातत्याने चर्चा करत होतो. आम्ही चर्चा केलेल्या गोष्टी अंमलात आणू शकलो याचा आनंद आहे.’
हेही वाचा – Washington Sundar : त्रिफळाचीत करत ७ विकेट्स आणि खास पराक्रम
‘मी फक्त एक खेळाडू म्हणून काय करू शकतो याचा विचार करत आहे’ –
वॉशिंग्टन सुंदर म्हणाला की, अष्टपैलू खेळाडूच्या कोणत्याही विशिष्ट शैलीचे पालन न करता त्याचे कौशल्य सुधारण्याचा त्याचा हेतू होता. तो म्हणाला, ‘कोणत्याही गोष्टीबद्दल जास्त विचार करायच नाही, अशी माझी धारणा आहे. मी फक्त एक खेळाडू म्हणून काय करू शकतो, यावर लक्ष केंद्रित करतो. मी खेळाडू म्हणून सातत्याने सुधारणा करत आहे.’ वॉशिंग्टनने पदार्पण केल्यापासून आठ वर्षांत ३१ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ६५ विकेट्स घेतल्या आहेत.