पाकिस्तान सुपर लीगचा (पीएसएल) सातवा हंगाम सुरू होण्यापूर्वीच करोना महामारीचा धोका निर्माण झाला आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आणि कराची किंग्जचा अध्यक्ष वसीम अक्रमला करोनाची लागण झाली आहे. वसीम अक्रम नुकताच ओमानहून परतला. लेजेंड्स लीग क्रिकेटमध्ये अक्रम खेळत होता. अक्रमशिवाय हैदर अली, वहाब रियाझ, कामरान अकमल यांच्यासह अनेक खेळाडू करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.
कराची किंग्जसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे, कारण सुपर लीगचा सातवा हंगाम २७ जानेवारीपासून सुरू होत आहे. अशा परिस्थितीत लीगचा पहिला सामना विजेता मुलतान्स सुलतान आणि उपविजेता कराची किंग्ज यांच्यात होणार आहे. पीएसएलचे पहिले १५ सामने कराचीमध्ये आणि उर्वरित १९ सामने लाहोरमध्ये खेळवले जातील.
हेही वाचा – Australian Open : नदालची सेमीफायनलमध्ये धडक; इतिहास रचण्यापासून ‘राफा’ दोन पावलं दूर!
पीएसएलचा अंतिम सामना २७ फेब्रुवारीला लाहोरमध्ये होणार आहे. २०१६ पासून सुरू होणाऱ्या या लीगमध्ये ६ संघ सहभागी होत आहेत. यामध्ये इस्लामाबाद युनायटेड, कराची किंग्ज, लाहोर कलंदर, मुलतान्स सुलतान, पेशावर झल्मी आणि क्वेटा ग्लॅडिएटर्स यांचा समावेश आहे.