Wasim Akram on PCB Chief Zaka Ashraf: २०२३च्या विश्वचषक स्पर्धेतील पाकिस्तान क्रिकेट संघाची अवस्था अत्यंत वाईट आहे. या संघाने सलग तीन सामने गमावले आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना हरल्यानंतर अफगाणिस्ताननेही एकतर्फी झालेल्या सामन्यात त्यांचा आठ गडी राखून पराभव केला. या पराभवानंतर पाकिस्तानमध्ये एकच खळबळ उडाली आहे. बाबर आझमपासून ते पाकिस्तान क्रिकेट बोर्डापर्यंत माजी दिग्गज सर्वांवर आपला राग काढत आहेत. पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रमने पीसीबी अध्यक्ष झका अश्रफ यांच्यावर निशाणा साधला आहे. पाकिस्तान संघाच्या लाजिरवाण्या कामगिरीवर अक्रमने पीसीबीला धारेवर धरले असून काही सल्ले देखील दिले आहेत. तो म्हटला की, “तुम्ही येताच तुमची माणसे भरायला सुरुवात केली. कधी कधी देशाचाही विचार करा.”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वसीम अक्रम वृत्तवाहिनी ‘ए’ स्पोर्ट्सशी बोलताना पाकिस्तानच्या पराभवासाठी पीसीबीला जबाबदार धरले. अक्रमने पीसीबी प्रमुख झका अश्रफ यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, “आता अचानक ते चेअरमन झाले आणि येताच सगळी सिस्टीम बदलू लागले आहेत. तुम्ही पीसीबी मधून लोकांना काढून टाकले आणि स्वतःची माणसे नेमायला सुरुवात केली. तुम्हाला परदेशी प्रशिक्षक खूप आवडतात. तुम्हाला आपले खेळाडू नाही चालले नाही आणि त्यांचाही कोणी सापडला नाही, तर तुम्ही ऑनलाइन प्रशिक्षक ठेवला. पुढच्या वेळी, माझ्या प्रिय लोकांनो, आधी स्वतःचा विचार करताना किमान देशाचाही विचार करा.”

पीसीबी प्रमुखांनी जुनी प्रणाली का बदलली: अक्रम

अक्रम पुढे म्हणाला, “हाय परफॉर्मन्स सेंटर तयार करण्यासाठी जुन्या लोकांनी खूप मेहनत घेतली होती. तुम्ही येताच ते सर्व बदललेत. त्याला राष्ट्रीय प्रशिक्षण सेंटर बनवले. हा बदल का केला हे मला समजत नाही. आधीच व्यवस्था होती मग त्यात एवढा बदल कशाला? मी तुम्हाला पैज लावून सांगू इच्छितो की गेल्या आठ महिन्यांपासून त्या हाय परफॉर्मन्स सेंटरमध्ये एकही शिबिर आयोजित केले गेले नाही. पीसीबी प्रमुखांनी जुनी प्रणाली का बदलली? याचेच मला आश्चर्य वाटत आहे.”

हेही वाचा: Akshar Patel: दुखापतीमुळे विश्वचषकातून बाहेर पडलेल्या अक्षरला पांड्याच्या जागी मिळणार का संधी? सय्यद अली मुश्ताक ट्रॉफीमध्ये शानदार कामगिरी

अफगाणिस्तान-पाकिस्तान सामन्यात काय घडलं?

नाणेफेक जिंकल्यानंतर पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत सात गडी गमावून २८२ धावा केल्या. पाकिस्तानकडून बाबरने ७४ धावा आणि अब्दुल्ला शफीकने ५८ धावांची खेळी केली. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानने ४९ षटकांत दोन गडी गमावून २८६ धावा केल्या आणि सामना आठ विकेट्स राखून जिंकला. अफगाणिस्तानकडून इब्राहिम जादरण ८७ धावा, रहमत शाहने नाबाद ७७ आणि रहमानउल्ला गुरबाजने ६५ धावा केल्या. कर्णधार शाहिदीने नाबाद ४८ धावा केल्या.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wasim akram furious at pcb chief held responsible for poor performance of pakistan cricket team avw