Wasim Akram’s cat haircut bill 1000 Australian Dollars : पाकिस्तानने रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत ऐतिहासिक विजय नोंदवला. मोहम्मद रिझवान आणि त्याच्या संघाने पर्थमधील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचा आठ गडी राखून पराभव केला. पाकिस्तानने तीन सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली. अशा प्रकारे पाकिस्ताने २२ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात पहिला वनडे मालिका विजय मिळवला. सध्या वादात सापडलेल्या या संघाने खेळाच्या सर्व विभागांमध्ये ऑस्ट्रेलियाचा पूर्णपणे पराभव केला. या अविस्मरणीय विजयादरम्यान समालोचन करताना वसीम अक्रमने एक मजेशीर किस्सा सांगितला, ज्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
वसीम अक्रमचा व्हिडीओ व्हायरल –
पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रमला ऑस्ट्रेलियात आपल्या मांजरीचे केस कापण्यासाठी खूप खर्च करावा लागला. कॉमेंट्री दरम्यान या माजी वेगवान गोलंदाजाने एका घटनेचा उल्लेख केला, ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. त्याचे सहकारी समालोचकही हैराण झाले. अक्रमने सांगितले की, ऑस्ट्रेलियामध्ये मांजरीचे केस कापण्यासाठी त्याला १००० ऑस्ट्रेलियन डॉलर (५५, २७४ भारतीय रुपये) खर्च करावे लागले.
वसीम अक्रमने सांगितली संपूर्ण घटना –
वसीम अक्रम म्हणाला, “मी काल माझ्या मांजरीचे केस कापले. त्यासाठी मला १००० ऑस्ट्रेलियन डॉलर द्यावे लागले. कारण त्यांना मांजरीला शांत करण्यासाठी भूल द्यावी लागली, यानंतर मांजरीला खायला द्यावे लागले. यावर मी म्हणालो, इतक्या पैशात पाकिस्तानमध्ये सुमारे २०० मांजरींचे केस कापता येतात.” अक्रमने हे सांगितल्यानंतर, सर्वजण आश्चर्यचकित झाले आणि हसायला लागले. हा क्षण अधिक मजेदार करण्यासाठी, त्याने बिल देखील शेअर केले, ज्यामुळे इतर समालोचकही हसू लागले, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
वसीम अक्रमने सांगितला संपूर्ण खर्च –
वसीम अक्रमने सहकारी समालोचकांना बिल देखील दाखवले. ज्यामध्ये त्याच्याकडून वैद्यकीय तपासणीसाठी १०५, भूल देण्यासाठी ३०५ आणि केस कापण्यासाठी ४० ऑस्ट्रेलियन डॉलर आकारले गेले. त्याचबरोबर यामध्ये काही अतिरिक्त शुल्क देखील होते, जसे की केस कापल्यानंतरच्या काळजीसाठी १२० आणि कार्डिओ चाचणीसाठी २५१ ऑस्ट्रेलियन डॉलर घेण्यात आले.