Wasim Akram Big Statement About Pakistan Team in ODI World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक २०२३ या स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना १५ ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद भूषविणाऱ्या भारतासाठी ट्रॉफी जिंकण्याच्या आशा वाढल्या आहेत. दरम्यान पाकिस्तानचा माजी खेळाडू वसीम अक्रमने २०२३ च्या विश्वचषकातील पाकिस्तान संघाबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शानदार सामन्याची बरीच चर्चा आहे. भारतीय संघाने आतापर्यंत दोन वेळा (१९८३ आणि २०११) एकदिवसीय विश्वचषक जिंकण्यात यश मिळवले आहे, तर पाकिस्तानने एकदा विश्वचषक जिंकला आहे. १९९२ साली पाकिस्ताने इंग्लंडविरुद्ध २२ धावांनी विजय मिळवून विश्वचषक जिंकला होता.
दरम्यान, पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रम याने आयसीसीशी संवाद साधताना २०२३ च्या विश्वचषकातील पाकिस्तान संघाबाबत मोठे वक्तव्य केले आहे.वसीम अक्रमने आयसीसीला सांगितले की, पाकिस्तान संघाचे खेळाडू तंदुरुस्त आणि फॉर्ममध्ये राहिल्यास पाकिस्तान संघ यावेळी आपला दुसरा एकदिवसीय विश्वचषक ट्रॉफी जिंकू शकेल, अशी मला आशा आहे.
पाकिस्तान संघाची कमान जगातील अव्वल क्रमांकाचा फलंदाज बाबर आझमच्या हाती असून त्याच्याकडे अनुभवी खेळाडूंचा एक गट आहे, जो त्याला साथ देईल. मोहम्मद रिझवान, इमाम-उल-हक आणि फखर जमान हे संघाचे महत्त्वाचे फलंदाज आहेत, तर तोच संघ शाहीन आफ्रिदी, हारिस रौफ आणि नसीम शाह सारख्या वेगवान गोलंदाजांनी सजलेला आहे.
पाकिस्तानकडे एक संघ म्हणून प्रत्येक गुणवत्ता आहे, जी दाखवत आहे की पाकिस्तानला यावर्षीचा दुसरा विश्वचषक ट्रॉफी मिळू शकेल. वसीम अक्रम म्हणाला, “आमच्याकडे एक चांगला एकदिवसीय संघ आहे, ज्याची कमान बाबर आझमच्या हातात आहे.” अक्रमने आयसीसीला सांगितले की भारताची परिस्थिती पाकिस्तानसारखीच असेल, त्यामुळे जोपर्यंत खेळाडू तंदुरुस्त राहतील आणि गेम प्लॅननुसार खेळतील, तोपर्यंत त्यांना या विश्वचषकात सर्वोत्तम कामगिरी करण्याची संधी मिळेल.