जय शाह यांनी या आठवड्यात सांगितले होते की, २०२३ मध्ये पाकिस्तानमध्ये होणाऱ्या आशिया चषकासाठी भारतीय संघ पाकिस्तानला जाणार नाही. या विधानानंतर अनेक माजी क्रिकेटपटू आणि पीसीबीने जय शाह यांच्यावर टीका केली. आता पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रमनेही जय शाहवर नाराजी व्यक्त केली आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, भारतीय संघ २०२३ आशिया चषकासाठी पाकिस्तानला जाणार नाही. यानंतर पाकिस्तानच्या अनेक माजी क्रिकेटपटूंनी बीसीसीआयच्या या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली होती. जय शाहच्या या वक्तव्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) पुढच्या वर्षी भारतात होणाऱ्या २०२३ मध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकात पाकिस्तानला भारतात न येण्याची धमकी दिली. आता पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रमनेही जय शाहच्या वक्तव्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा : आशिया चषक २०२३ साठी भारत पाकिस्तानला जाणार का? यावर रोहित शर्माचे मोठे विधान, जाणून घ्या
ए स्पोर्ट्सवरील संभाषणात वसीम अक्रम म्हणाला, “क्रिकेट बोर्डाने जबरदस्त विधान केले आहे. पाकिस्तान क्रिकेट कसा खेळतो हे भारत ठरवू शकत नाही. पाकिस्तानने १०-१५ वर्षांनंतर संघांचे यजमानपद सुरू केले. मी माजी क्रिकेटपटू आहे. राजकीय पटलावर काय चालले आहे माहीत नाही, पण त्याबद्दल बोलणे गरजेचे होते. तो पुढे म्हणाले, “जय शाह यांना काही सांगायचे असेल तर त्यांनी आधी पीसीबी अध्यक्षांशी फोनवर बोलावे किंवा आशियाई क्रिकेट परिषदेची बैठक बोलावून या विषयावर चर्चा करावी. संपूर्ण कौन्सिलने आशिया चषकासाठी पाकिस्तानचे नामांकन केले असताना आम्ही पाकिस्तानला जाणार नाही असे तुम्ही म्हणू शकत नाही.”
यामागे महत्वाचे कारण म्हणजे दोन्ही देशांमधील राजकीय तणाव असून यामुळे क्रिकेटचे सामन्यांवर याचा मोठा परिणाम होताना दिसत आहे. भारताने शेवटचा पाकिस्तानला २००८ मध्ये भेट दिली होती. त्यानंतर भारतीय संघ कधीच पाकिस्तानला गेला नाही. आशियाई क्रिकेट परिषदेने २०२३ च्या आशिया चषकाच्या यजमानपदाचा अधिकार पाकिस्तानला दिला आहे. हे लक्षात ठेवण्यासारखे आहे की २०१८ च्या आशिया चषक स्पर्धेत भारत या स्पर्धेचे अधिकृत यजमान होता, परंतु राजकीय तणावामुळे ते यूएईमध्ये आयोजित करणे भाग पडले.