पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज वसीम अक्रमच्या भारत दौर्यावर खेळलेल्या होळीचा जुना फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 1987मध्ये पाकिस्तान संघ भारतात आला होता. त्यावेळी दोन्ही संघांनी एकाच पूलमध्ये होळी खेळली होती. क्रीडा सादरकर्ते गौतम भिमानी यांनी हा फोटो ट्विट केला. त्यानंतर वसीम अक्रमनेही होळीच्या शुभेच्छा देत हा फोटो रिट्विट केला. आता या फोटोवर अक्रमच्या पत्नीने प्रतिक्रिया दिली आहे.
अक्रमची पत्नी शनीरा म्हणाली, ”आज जेव्हा ट्विटर उघडले तेव्हा माझ्या लक्षात आले की, माझा नवरा अंडरवेअरमध्ये आहे. ही सामान्य गोष्ट आहे का?” या प्रतिक्रियेवर अक्रमनेही आपले उत्तर दिले. तो म्हणाला, ”ही एक नवीन सामान्य गोष्ट आहे पत्नी आणि तुझ्या माहितीसाठी मला सांगायचे आहे की, ही त्यावेळी असणारी शॉर्ट्स होती.”
It’s a new normal biwi and for your kind information they are shorts they were it then https://t.co/jeDlLyf2JJ
— Wasim Akram (@wasimakramlive) March 30, 2021
गौतम भिमानी यांनी फोटोला ”माझ्या आवडत्या क्रिकेट होळीची आठवण”, असे कॅप्शन दिले आहे. वसीम अक्रमनेही भिमानी यांची ही पोस्ट रिट्विट करत चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ”होळीच्या शुभेच्छा. काय दिवस होते ते. 1987चा भारत दौरा”, असे अक्रमने शेअर केलेल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.
1987मध्ये पाकिस्तानी संघ इम्रान खानच्या नेतृत्वात भारत दौर्यावर होता. या दोन संघांमध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका आणि सहा सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली गेली. त्यावेळी वसीम अक्रमदेखील पाकिस्तान संघाचा एक भाग होता. त्यावेळी तो अवघ्या 20 वर्षाचा होता.
पाकिस्तान क्रिकेटमधील एक महान खेळाडू म्हणून वसीम अक्रमचे नाव घेतले जाते. त्याने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 6615 धावा केल्या आणि एकूण 916 बळी घेतले.