माजी भारतीय क्रिकेटपटू वसीम जाफर आजकाल आपल्या सोशल मीडियावरील उपस्थितीमुळे जास्त चर्चेत असतो. प्रतिस्पर्धी देशांतील खेळाडूंना टोमणे मारने असो किंवा भारतीय खेळाडूंना खास आपल्या गुढ शैलीमध्ये सल्ले देणे असो दोन्हीही गोष्टी तो अगदी चोखपणे पार पाडतो. ट्वीटरवरती तो विशेष सक्रिय असतो. रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा निकाल लागल्यानंतर जाफरने तत्काळ ट्वीट करून विजेत्या संघाला आणि प्रशिक्षकांना आपल्या शैलीत शुभेच्छा दिल्या.
मध्य प्रदेशच्या संघाने प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली आपले पहिले रणजी विजेतपद पटकावले. त्यांचे अभिनंदन करण्यासाठी वसीम जाफरने मराठी आणि इंग्रजीभाषेत खास ट्वीट केले, “चंदू भाई, तुम्हाला मानलं, अगोदर मुंबई, नंतर विदर्भ आणि मध्य प्रदेश, हे अतुल्य आहे! जेव्हा करंडक जिंकण्याचा प्रश्न येतो तेव्हा तुम्ही सर्वोत्कृष्ट प्रशिक्षक ठरता. कर्णधार आदित्य श्रीवास्तव, मध्य प्रदेशचा संघ आणि सहाय्यक कर्मचारी, असे सर्वांचे अभिनंदन.”
माजी भारतीय क्रिकेटपटू वसीम जाफर मुंबईचा माजी रणजीपटूदेखील आहे. त्याच्या नावावर रणजी क्रिकेटमधील अनेक विक्रम आहेत. याशिवाय वसीमचा पुतण्या अरमान जाफरदेखील मुंबईच्या रणजी संघात आहे. त्यामुळे रणजी क्रिकेटबद्दल वसीमला विशेष जिव्हाळा आहे. जेव्हा मध्य प्रदेशच्या संघाने रणजी इतिहासातील आपली पहिले-वहिले विजेतेपद पटकावले तेव्हा वसीम जाफारने मध्य प्रदेशसाठी ट्वीट केले.
स्पर्धेच्या ८८ वर्षांच्या इतिहासात मध्य प्रदेशने दुसऱ्यांदाच अंतिम फेरी गाठली होती. अंतिम फेरीत पोहचण्यासाठी मध्य प्रदेशच्या संघाने अतोनात कष्ट केले होते. अंतिम सामन्यात चमकदार कामगिरी करत मध्य प्रदेशच्या संघाने मुंबईचा पराभव केला. याचे सर्वाधिक श्रेय प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांना जाते.
ज्या मुंबईच्या संघाविरुद्ध चंद्रकांत पंडित यांचा संघ दोन हात करत आहे एकेकाळी त्याच मुंबई संघाचे तेदेखील एक भाग होते. त्यांनी सचिन तेंडुलकरचे मार्गदर्शक आणि प्रसिद्ध क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्याकडून क्रिकेटमधील बारकावे शिकून घेतलेले आहेत. देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईसाठी खेळलेल्या १३८ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये त्यांनी आठ हजार २०९ धावा केलेल्या आहेत. त्यामध्ये २२ शतके आणि ४२ अर्धशतकांचा समावेश आहे. पंडित यांनी भारतीय संघासाठी पाच कसोटी आणि ३६ एकदिवसीय सामने खेळले आहेत. ते १९८६च्या विश्वचषक संघाचा भाग होते.
क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर चंद्रकांत पंडित यांनी प्रशिक्षक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यांनी आतापर्यंत १०१५-१६ मध्ये मुंबई, २०१७-१८ आणि २०१८-१९ मध्ये विदर्भाच्या संघाला रणजी विजेते बनवलेले आहे. अशा या यशस्वी प्रशिक्षकाच्या हाती दोन वर्षांपूर्वी मध्य प्रदेशचा संघ आला. त्यांच्या कार्यकाळाच्या पहिल्याच वर्षी मध्य प्रदेशचा संघ साखळी फेरीतच बाद झाला. त्यानंतर हंगामात म्हणजेच यावेळी मध्य प्रदेशच्या संघाने जोरदार मुसंडी मारली.