भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पदार्पणवीर श्रेयस अय्यरने शानदार शतक झळकावले. श्रेयस अय्यर भारताच्या पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावणारा १६वा आणि घरच्या मैदानावर पदार्पणाच्या कसोटीत शतक झळकावणारा १०वा भारतीय फलंदाज ठरला. शिवाय, मुंबईकर असलेल्या भारताच्या तीन फलंदाजांनी पहिल्याच कसोटीत शतक झळकावले आहे. यामध्ये रोहित शर्मा, पृथ्वी शॉ आणि आता श्रेयस अय्यरच्या नावांचा समावेश झाला आहे.
जर मुंबईच्या फलंदाजाने टीम इंडियासाठी पदार्पण केले, तर तो पहिल्या कसोटी सामन्यात शतक झळकावतो, असे संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाले. मात्र भारताचा माजी सलामीवीर आणि मुंबईकडून खेळलेला वसीम जाफरने याप्रकरणी दुःख व्यक्त केले. मुंबईचे सर्वच फलंदाज पदार्पणात शतक झळकावत नाहीत, हे त्याने एका मीमद्वारे सांगितले. वसीम जाफरने ”मै हू ना” य़ा बॉलीवूड चित्रपटातील एका संवादाद्वारे स्वत: लाच ट्रोल केले आहे.
हेही वाचा – IND vs NZ : “१० रुपये की पेप्सी, अय्यर भाई sexy”, चाहत्यांच्या घोषणेनं कानपूरचं मैदान दुमदुमलं; पाहा VIDEO
भारताचा पहिला डाव
कसोटीच्या दुसऱ्या दिवशी लंचनंतर भारताचा पहिला डाव १११.१ षटकात ३४५ धावांवर आटोपला आहे. श्रेयसच्या शतकी खेळीव्यतिरिक्त सलामीवीर शुबमन गिलने ५२ धावांचे योगदान दिले. वरची फळी गारद झाल्यानंतर श्रेयस अय्यर आणि रवींद्र जडेजा यांनी डाव सावरला. या दोघांनी १२१ धावांची भागीदारी रचली. जडेजाने ५० धावांची खेळी केली. त्याने ६ चौकार ठोकले. न्यूझीलंडकडून टिम साऊदीने अर्धा संघ गारद केला.