रविवारी (१७ जुलै) भारत आणि इंग्लंड दरम्यान मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट स्टेडियममध्ये निर्णायक एकदिवसीय सामना झाला. या सामन्यात भारताने इंग्लंडचा पाच गडी राखून पराभव केला. त्यामुळे भारताला तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका जिंकण्यात यश आले. भारताच्या या ऐतिहासिक विजयानंतर अनेक माजी खेळाडूंनी सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव केला. सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा विषय आला म्हणजे त्यात वसिम जाफर नेहमीच आघाडीवर असतो. आता देखील त्याने आपल्या खास शैलीत भारतीय संघाचे कौतुक केले आणि इंग्लंडची खिल्लीही उडवली आहे.
मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट स्टेडियममध्ये झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने अप्रतिम खेळ दाखवला. ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्या भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरले. पंतने ११३ चेंडूत नाबाद १२५ धावांची खेळी केली. ज्यामध्ये १६ चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. हार्दिक पंड्यानेही ५५ चेंडूत ७१ धावा केल्या. भारताची सलामीची फळी ढेपाळल्यानंतर प्रचंड दबावात असतानाही दोघांनी कौतुकास्पद खेळ केला. वसिम जाफरने या दोघांची तुलना ‘आरआरआर’ या दाक्षिणात्य चित्रपटातील रामचरण आणि ज्युनिअर एनटीआर या दोन अभिनेत्यांशी केली आहे. त्यासाठी त्याने भन्नाट ट्वीट केले आहे.
याशिवाय, भारताने सामना आणि मालिका जिंकल्यानंतर जाफरने आणखी एक ट्वीट करून इंग्लंडच्या ‘बेझबॉल’ रणनीतीची खिल्ली उडवली आहे. सोबतच त्याने आपला पारंपरिक ‘ट्विटर शत्रू’ मायकेल वॉनलाही कोपरखळी मारली आहे. वसिम जाफरने लाकडाच्या बाजेवर झोपून इंग्लंडच्या ‘बेझबॉल’ रणनीतीची खिल्ली उडवली आहे. जाफरचे दोन्ही ट्वीट क्रिकेट चाहत्यांना प्रचंड आवडले आहेत.
वसिम जाफर नेहमीच आपल्या खोचक आणि सूचक ट्वीट्ससाठी ओळखला जातो. भारतीय संघावर किंवा खेळाडूंवर कुरघोडी करणाऱ्या परदेशी खेळाडूंना जोरदार प्रत्त्युतर देण्याचे काम तो करत असतो. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन आणि जाफरची ट्विटरवर रंगणारी जुगलबंदी क्रिकेट चाहत्यांना विशेष आवडते.