फिरकीपटू अक्षर पटेलच्या पाच विकेट्समुळे भारताने पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी शनिवारी न्यूझीलंडला पहिल्या डावात २९६ धावांत गुंडाळत आघाडी घेतली, तरीही यजमानांनी दुसऱ्या डावात सलामीवीर शुबमन गिलला लवकर गमावले. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताची धावसंख्या १ बाद १४ धावा होती. आता भारताकडे एकूण ६३ धावांची आघाडी आहे. खेळ थांबल्यानंतर अक्षर त्याचा वरिष्ठ फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनशी संभाषण करत होता. यावेळी त्याच्या हातात चेंडू होता. या चेंडूमुळे टीम इंडियाचा माजी सलामीवीर वसीम जाफरने अक्षर पटेलचीच फिरकी घेतली.
पाच विकेटची आठवण म्हणून अक्षरच्या हातात असलेल्या चेंडूवर २७ नोव्हेंबर अशी तारीख असायला हवी होती. पण त्यावर चुकीचा महिना लिहिला गेला. नोव्हेंबर ऐवजी ऑक्टोबर लिहिण्यात आले होते. जाफरने ही चूक शोधत ट्वीट केले, ”अक्षर पटेलने आज चेंडूवर चुकीची तारीख लिहून एक चूक केली. २७ नोव्हेंबर आहे बापू.”
यावर अक्षरने उत्तर देत लिहिले, ”मी हे केले नाही. सूर्यकुमार यादवने हे लिहिले आहे.” तेव्हा जाफरने म्हटले, ”अरे! आता सूर्यकुमार यादवला काय शिक्षा द्यायची? त्याला द वॉल (प्रशिक्षक राहुल द्रविड) समोर सादर करा?”.
अक्षरने कानपूर कसोटीच्या पहिल्या डावात ६२ धावांत पाच विकेट घेतल्या. कसोटी कारकिर्दीत अक्षरने ही किमया पाचव्यांदा केली आहे. पहिल्या ४ कसोटी सामन्यांमध्ये भारतीय म्हणून सर्वाधिक पाच वेळा पाच बळी घेण्याचा विक्रम अक्षर पटेलच्या नावावर आहे. नरेंद्र हिरवानी या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. अक्षरने इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण केल्यानंतर ३ सामन्यांत २७ बळी घेतले, ज्यामध्ये त्याने ४ वेळा एका डावात पाच विकेट घेतल्या आहेत.