भारत आणि न्यूझीलंड संघात शुक्रवारी पहिला टी-२० सामना पार पडला. या सामन्यात न्यूझीलंडने भारतावर २१ धावांनी शानदार विजय मिळवला. त्याचबरोबर तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. यानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफरने आपली प्रतिक्रिया दिली. ज्यामध्येत्याने टीम इंडियाच्या पराभवानंतर हार्दिक पांड्याच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
जाफर मते, ज्या पद्धतीची परिस्थिती होती त्यानुसार गोलंदाजी झाली नाही. रांचीमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-२० मध्ये, फिरकी गोलंदाजांना खेळपट्टीकडून भरपूर मदत मिळत होती, तरीही हार्दिकने हुड्डाच्या षटकांचा कोटा पूर्ण केला नाही. याशिवाय उमरान मलिक आणि शिवम मावी यांचा पुरेपूर उपयोग झाला नाही, तर त्यांच्या जागी तुम्ही अतिरिक्त फलंदाजाला खेळवू शकला असता, असा सल्लाही त्याने हार्दिकला दिला.
ईएसपीएनक्रिकइन्फोशी बोलताना जाफर म्हणाला, ”कदाचित, मला वाटते की आजची गोलंदाजी परिस्थितीनुसार नव्हती. दीपक हुड्डाची राहिलेली दोन षटके वापरता आली असती, कारण भारताकडे फिरकीचे फारसे पर्याय नव्हते.”
तो पुढे म्हणाला, “तुम्ही उमरान मलिकला एक षटक आणि मावीकडून दोन षटके टाकणार असाल, तर त्याच्या जागी अतिरिक्त फलंदाज आणणे हा एक चांगला पर्याय असेल. कदाचित हे बदल येत्या सामन्यांमध्ये पाहायला मिळतील. नवीन चेंडूसह, स्विंगसाठी पुढे गोलंदाजी करण्यासाठी गेला आणि तेथे धावा दिल्या. पण भारताने नंतर चांगले पुनरागमन केले, वॉशिंग्टन आणि कुलदीपने ज्या प्रकारे गोलंदाजी केली, ती चमकदार होती. एकंदरीत मला वाटते की न्यूझीलंडने भारतापेक्षा चांगले क्रिकेट खेळले.”
सामन्याबद्दल बोलायचे, तर भारतीय संघाने प्रथम गोलंदाजी करताना न्यूझीलंड संघाला २० षटकांत १७६ धावांवर रोखले. त्यानंतर १७७ धावांचा पाठलाग करताना, भारतीय संघाला निर्धारित २० षटकांत ९ बाद १५५ धावाच करता आल्या. भारताकडून वाशिंग्टन सुंदरने शानदार कामगिरी करताना दोन विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर फलंदाजी करताना देखील त्याने आपली ताकद दाखवून देताना अर्धशतकी खेळी साकारली.