Wasim Jaffer’s big revelation about MS Dhoni: टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आज त्याचा ४२ वा वाढदिवस साजरा करत आहे. भारतीय क्रिकेटला शिखरावर नेण्यात या दिग्गज खेळाडूचे मोठे योगदान आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने तीन आयसीसी विजेतेपदे जिंकली आहेत. आता टीम इंडियाचा माजी खेळाडू वसीम जाफरने या अनुभवी खेळाडूबाबत मोठा खुलासा केला आहे. त्याने सांगितले की जेव्हा धोनी नवीन संघात सामील झाला होता, तेव्हा त्याला फक्त ३० लाख रुपये कमवायचे होते.
धोनीबद्दल वसीम जाफरचा मोठा खुलासा –
स्पोर्ट्सकीडाशी संवाद साधताना वसीम जाफरने एमएस धोनीबद्दल एक मोठा खुलासा केला. तो म्हणाला, “मी २००५ मध्ये पुनरागमन केले आणि एमएस धोनीने २००४ च्या उत्तरार्धात भारतीय संघात प्रवेश केला. मी, माझी पत्नी, दिनेश कार्तिक आणि त्याची पत्नी, धोनी सर्व मागच्या सीटवर बसायचो. एमएस धोनी माझ्या पत्नीसोबत खूप काही बोलायचा. तो म्हणत असे की, रांचीमध्ये आरामात राहण्यासाठी त्याला ३० लाख कमवावे लागतील.”
वहिनी, मला ३० लाख रुपये कमवायचे आहेत –
वसीम जाफर पुढे म्हणाला, “एमएस धोनीला रांची सोडायचे नव्हते. काहीही झाले तरी मी रांची सोडणार नाही’ असे तो म्हणाला होता. तो संघात नवीन होता, त्यामुळे ३० लाख रुपये आपल्यासाठी खूप असतील असे त्याला वाटायचे. मला आठवते की त्याने माझ्या पत्नीला सांगितले होते की, वहिनी मला ३० लाख रुपये कमवायचे आहेत.”
एमएस धोनीची कामगिरी –
एमएस धोनी हा एकमेव कर्णधार आहे, ज्याने तीनही मोठ्या आयसीसी ट्रॉफी जिंकल्या आहेत. धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २००७ मध्ये टी-२० विश्वचषक, २०११मध्ये एकदिवसीय विश्वचषक आणि २०१३ साली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. धोनीने भारतासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये २२३८४ धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्येही त्याने एक विकेट घेतली आहे.
एमएस धोनीने आपल्या १५-१६ वर्षांच्या कारकिर्दीत बरेच काही केले, ज्यानंतर त्याचे नाव आज भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून घेतले जाते. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटशिवाय आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जला पाच वेळा चॅम्पियन बनवले. २०१९ विश्वचषक उपांत्य फेरीतील पराभवानंतर धोनी पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतला नाही. १५ ऑगस्ट २०२० रोजी संध्याकाळी अचानकपणे आपल्या शैलीत धोनीने निवृत्तीची घोषणा करून सर्वांना चकित केले