येत्या २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीमध्ये आशिया चषक खेळवला जाणार आहे. या संपूर्ण स्पर्धेचे वेळापत्रक मंगळवारी (२ ऑगस्ट) जाहीर करण्यात आले आहे. वेळापत्रकानुसार, भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशन ‘अ’ गटात आहेत. दोन्ही देश २८ ऑगस्ट रोजी आमनेसामने असतील. भारत-पाकिस्तान सामन्याची तारीख निश्चत होताच सोशल मीडियावर क्रिकेट चाहत्यांनी आपल्या प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे. भारताचा माजी खेळाडू वसिम जाफरचादेखील यामध्ये समावेश आहे. जाफरने भारत-पाकिस्तान सामन्याच्या पार्श्वभूमीवर एक भन्नाट मीम शेअर केले आहे.
भारताचा माजी फलंदाज वसिम जाफर क्रिकेटमधून निवृत्त झाल्यापासून सोशल मीडियावर अधिक सक्रीय झाला आहे. तो कधी आपल्या गुढ सल्ल्यांमुळे किंवा कधी मजेशीर प्रतिक्रियांमुळे चर्चेत असतो. वसिम जाफर भारतीय संघाचा एकही सामना चुकवत नाही. प्रत्येक सामन्याशी संबंधित तो काहीना काही ट्वीट करत असतो. आपल्या या सवयीप्रमाणे त्याने आशिया चषकात होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्याबाबतही ट्वीट केले आहे.
आशिया चषकामध्ये दोन्ही गटातील दोन अव्वल संघ ‘सुपर फोर’ फेरीसाठी पात्र ठरतील. ‘अ’ गटातील भारत आणि पाकिस्तान संघ सुपर फोरसाठी पात्र ठरण्याची दाट शक्यता आहे. असे झाल्यास दोन्ही संघ २८ ऑगस्टनंतर ४ सप्टेंबरला पुन्हा आमनेसामने येऊ शकतात. ही बाब लक्षात घेऊन वसिम जाफरने टीव्ही प्रसारकांची चेष्टा केली आहे. त्याने एक विनोदी व्हिडिओ शेअर केला आहे. त्याच्या या मीमवर क्रिकेट चाहत्यांनी कमेंट्स आणि लाइक्सचा पाऊस पाडला आहे.
हेही वाचा – ICC T20 Ranking: सूर्यकुमार यादव सुसाट! बाबर आझमचे सिंहासन धोक्यात
भारत आणि पाकिस्तानमधील ताणलेल्या परराष्ट्रीय संबंधामुळे दोन्ही देश आपापसात क्रिकेट मालिका खेळत नाही. अशा परिस्थितीमध्ये फक्त आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आयोजित केलेल्या स्पर्धांमध्ये हे दोन्ही देश समोरासमोर येतात. त्यामुळे आशिया चषकातील सामन्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. शिवाय त्यानंतर टी २० विश्वचषकातही दोन्ही देश एकमेकांविरुद्ध खेळताना दिसतील. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना आनंद झाला आहे.