न्यूझीलंड क्रिकेटनंतर, इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) पाकिस्तान दौरा रद्द केला. न्यूझीलंडने सुरक्षेच्या कारणास्तव, तर ईसीबीने कोविड-१९ संबंधी निर्बंधांमुळे दौरा रद्द करण्याची घोषणा केली. पाकिस्तानात पोहोचल्यानंतर न्यूझीलंड संघ दौरा रद्द करून मायदेशी परतला, यामुळे क्रिकेट जगतात अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) नवे प्रमुख रमीज राजा, पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर यांच्यासह सर्व दिग्गज पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी यावर टीका केली आहे, तर भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा आणि वसीम जाफर यांनीही या गोष्टीला चुकीचे ठरवले. जाफरने एक ट्विट केले, त्यानंतर त्याला खूप ट्रोल केले जात आहे.

जाफरने ट्विटरवर लिहिले, ”पाकिस्तान क्रिकेट बोर्डाजवळ निराश होण्याचे कारण आहे. करोनाच्या काळात पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजने गेल्या वर्षी इंग्लंडचा दौरा केला होता. इंग्लंड पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजचा ऋणी आहे. ईसीबीने परस्पर संमतीनंतर असा दौरा रद्द करायला नको होता. जेव्हा क्रिकेट रद्द होते, तेव्हा कोणीही विजेता नसतो.”

जाफरच्या ट्वीटवर उमटल्या प्रतिक्रिया

‘‘इंग्लंडच्या पुरुष आणि महिला संघांच्या पाकिस्तानात होणाऱ्या अतिरिक्त सामन्यांविषयी चर्चा करण्यासाठी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाची बैठक पार पडली. यामध्ये झालेल्या चर्चेनुसार ऑक्टोबरला होणाऱ्या या दौऱ्यातून माघार घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,’’ असे ‘ईसीबी’ने म्हटले. इंग्लंडचा संघ २००५ नंतर प्रथमच पाकिस्तानचा दौरा करणार होता. १३, १४ ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध त्यांचे दोन ट्वेन्टी सामने होणार होते. दौरा रद्द करण्याच्या या निर्णयाबद्दल ‘ईसीबी’ने पाकिस्तान क्रिकेट मंडळाची माफी मागितली आहे.

हेही वाचा – ‘‘आधी भारतीय संघ आमच्या निशाण्यावर होता, आता…”, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष भडकले

न्यूझीलंड संघाने मागील शुक्रवारी पाकिस्तान दौऱ्यातून अचानक माघार घेतली होती. पहिल्या एकदिवसीय सामन्यापूर्वी काही तास न्यूझीलंडने सामन्यात खेळण्यास नकार दिला. परंतु न्यूझीलंडचा संघ तीन एकदिवसीय आणि पाच ट्वेन्टी-२० सामन्यांसाठी पुढील वर्षी पाकिस्तान दौरा करण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती न्यूझीलंड क्रिकेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड व्हाईट यांनी दिली.

Story img Loader