भारतीय कसोटी संघाचा कप्तान विराट कोहलीला गेल्या दोन वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावता आलेले नाही. याशिवाय त्याची कसोटी सरासरीही घसरली आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज मिचेल स्टार्कने गुरुवारी अॅशेस मालिकेतील चौथ्या सामन्यात इंग्लंडविरुद्ध नाबाद ३४ धावांची खेळी केली. त्याच्या खेळीनंतर ऑस्ट्रेलियन मीडियाने कोहली आणि स्टार्कची तुलना केली आणि सांगितले, ”गेल्या दोन वर्षांत कोहली सरासरीच्या बाबतीत स्टार्कच्या मागे आहे.”
भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफरला ऑस्ट्रेलियन मीडियाची ही गोष्ट आवडली नाही. त्याने जशाच तसे उत्तर दिले. सोशल मीडियावर जाफरने लिहिले, ”नवदीप सैनीची एकदिवसीय कारकिर्दीतील सरासरी ५३.५० आहे. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्टीव्ह स्मिथची सरासरी अवघी ४३.३४ आहे.” जाफरच्या या ट्वीटवर अनेकजण व्यक्त झाले आहेत.
हेही वाचा – IND vs SA : विराट शेवटचा कसोटी सामना खेळणार की नाही? द्रविड म्हणतो, ‘‘त्याच्या फिटनेसमध्ये…”
१ जानेवारी २०१९ पासून कसोटी क्रिकेटमध्ये मिचेल स्टार्कने १७ सामन्यांच्या २० डावांमध्ये ३८.६३ च्या सरासरीने ४२५ धावा केल्या आहेत. त्याने नाबाद ५४ धावांची सर्वात मोठी खेळी केली. त्याचवेळी विराट कोहलीने २२ सामन्यांच्या ३६ डावांमध्ये ३७.१७ च्या सरासरीने १२६४ धावा केल्या. यात त्याने २ शतके आणि ७ अर्धशतके केली. म्हणजेच स्टार्कची सरासरी कोहलीपेक्षा जास्त आहे. यामुळे ऑस्ट्रेलियन मीडियाने कोहलीची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला.