भारत आणि इंग्लंडदम्यान सुरू असलेल्या कसोटी सामना मैदानाबरोबरच मैदानाबाहेरील घडामोडींसाठी देखील चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर दोन्ही देशांच्या माजी खेळाडूंनी या सामन्याबाबत जोरदार प्रतिक्रिया देण्याचा धडाका सुरू केला आहे. सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा विषय आला म्हणजे त्यात वसिम जाफर आणि मायकल वॉन ही जोडी नेहमीच आघाडीवर असते. आता देखील वसिम जाफरने मायकल वॉनची खिल्ली उडवली आहे. इंग्लंडच्या माजी कर्णधाराला ऋषभ पंत आणि जॉनी बेअरस्टोची तुलना करणे महागात पडले आहे.
एजबस्टन कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय यष्टीरक्षक ऋषभ पंतने १४६ धावांची धमाकेदार खेळी केली. त्याने ८९ चेंडूत शतक झळकावून इतिहासात आपले नाव नोंदवले. तो आशियाबाहेर चार शतके झळकावणारा पहिला भारतीय यष्टीरक्षक फलंदाज बनला. त्याच्या या शतकानंतर इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू मायकेल वॉनने ट्वीट करत त्याची तुलना जॉनी बेअरस्टोशी केली होती.
मायकल वॉनच्या ट्वीटरवरील कुरापतींना माजी भारतीय क्रिकेटपटू वसिम जाफर कायम जोरदार प्रत्त्युतर देतो. यावेळी देखील जाफरने वॉनवर अजिबात दया दाखवली नाही. कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी जाफरला आयती संधी मिळाली. त्यानंतर कसोटीच्या तिसऱ्या दिवशी जॉनी बेअरस्टोने शतक ठोकले. जाफरने या संधीचा फायदा घेत वॉनला उत्तर दिले. “जॉनी बेअरस्टोला ऋषभ पंतसारखे खेळताना बघून खूप आनंद झाला,” असे ट्वीट जाफरने केले.