कर्णधार बाबर आझम (४२५ चेंडूंत १९६ धावा) आणि यष्टिरक्षक-फलंदाज मोहम्मद रिझवान (१७७ चेंडूंत नाबाद १०४) यांच्या शतकांमुळे पाकिस्तानला ऑस्ट्रेलियाविरुद्धचा दुसरा कसोटी क्रिकेट सामना अनिर्णित राखण्यात यश आले. या सामन्यामध्ये अवघ्या चार धावांनी आझमचं द्विशतक हुकलं. पण त्याने केलेल्या दमदार खेळीसाठी सर्वच स्तरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसतोय. विशेष म्हणजे सामना वाचवण्यासाठी आझमने केलेल्या या खेळीचं ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंनीही टाळ्या वाजवून कौतुक केलं. कराचीमधील या मैदानात बाबर बाबरचा जयघोष त्याच्या चाहत्यांनी सुरु केला असतानाच ऑस्ट्रेलियन खेळाडूही बाबरचं कौतुक करताना दिसले.
नक्की वाचा >> सर्व फॉरमॅटमध्ये हा पाकिस्तानी फलंदाज विराट, रोहितपेक्षाही सरस?; इंग्लंडच्या माजी कर्णधारानेही केलं कौतुक
कसोटी मालिकेतील या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिला डाव ९ बाद ५५६ धावांवर घोषित केल्यानंतर पाकिस्तानला १४८ धावांत गुंडाळले होते. मात्र, त्यांनी फॉलोऑन न देता पुन्हा फलंदाजी केली. त्यांनी हा डाव २ बाद ९७ धावांवर घोषित करत सामना जिंकण्यासाठी पाकिस्तानपुढे ५०६ धावांचे लक्ष्य ठेवले होते. पाकिस्तानने जवळपास दोन दिवस फलंदाजी करताना तब्बल १७१.४ षटके खेळून काढली.
पाकिस्तानची २ बाद २१ अशी स्थिती असताना आझम आणि अब्दुल्ला शफीक (९६) यांनी पाकिस्तानला सावरले. मग पाचव्या दिवशी अखेरच्या सत्रात त्यांनी तीन बळी झटपट गमावले. मात्र, ऑस्ट्रेलियाला विजयासाठी तीन बळींची आवश्यकता असताना रिझवानने शतक झळकावल्याने पाकिस्तानने सामना अनिर्णित राखला.
बाबर आझमने संयमी खेळी करत ७० हून अधिक षटकं एकट्याने खेळून काढली. त्यामुळेच तो बाद झाल्यानंतर त्याच्या या संघर्षपूर्ण खेळीला ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंनीही टाळ्या वाजवून दाद दिली. ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू बाबर पॅव्हेलियनमध्ये परत जात असताना टाळ्या वाजवतानाचे फोटो पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ट्विट केले असून त्यांनी याला स्पिरीट ऑफ क्रिकेट म्हणजेच खेळ भावनेचा आदर असं म्हटलंय.
अनेक चाहत्यांनी त्याचा बाद होतनाचा व्हिडीओही शेअर केलाय. बाबर बाद झाल्यानंतर कराचीच्या मैदानामधील पाकिस्तानी चाहत्यांनी उभं राहून बाबर बाबर अशा घोषणा देत त्याचं कौतुक केलं.
पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियामधील या मालिकेतील तिसरा सामना सोमवारपासून (२१ मार्च) खेळला जाईल.