भारताने यजमान ऑस्ट्रेलियावर तिसऱ्या वन-डे सामन्यात 7 गडी राखून मात करत, वन-डे मालिकेत 2-1 ने बाजी मारली. कसोटी पाठोपाठ वन-डे मालिका जिंकण्यातही भारतीय संघ यशस्वी ठरल्याने सध्या संघावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे. महेंद्रसिंह धोनी आणि केदार जाधवने शतकी भागीदारी रचत भारतीय संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. धोनीने 87 तर केदार जाधवने 61 धावांची खेळी केली. मात्र आजच्या सामन्यात धोनी हा खऱ्या अर्थाने नशीबवान म्हणावा लागेल. ऑस्ट्रेलियन खेळाडूंकडून दोनदा जीवदान आणि एकदा बॉल बॅटची कड घेऊनही योग्य अपील न केल्यामुळे धोनी मैदानात टिकून राहिला.

मधल्या काळात पिटर सिडलच्या गोलंदाजीवर धोनी मोठा फटका खेळण्याच्या नादात पुढे आला, मात्र त्याचा तो फटका हुकला. यावेळी पिडर सिडल आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी बॉल बॅटला लागून यष्टीरक्षकाकडे गेल्याचं म्हणत अपिल केलं, मात्र या अपिलाबद्दल ते आश्वस्त नव्हते, त्यामुळे पंचांनी धोनीला नाबाद ठरवलं. मात्र यानंतर तिसऱ्या पंचांच्या पाहणीत बॉल धोनीच्या बॅटची कड घेऊन यष्टीरक्षक कॅरीच्या हातात सामावलेला दिसत होता. मात्र तोपर्यंत कांगारुंनी हातातली संधी गमावली होती.

यानंतर मिळालेल्या जीवदानांचा पुरेपूर फायदा उचलत धोनीने केदार जाधवच्या साथीने शतकी भागीदारी रचत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. भारताचा ऑस्ट्रेलियातला हा पहिला वन-डे मालिका विजय ठरला आहे. यानंतर भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना होणार आहे.

Story img Loader